हवाई दलाचा मोठा निर्णय; सततच्या अपघातांनंतर MIG-21 जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 07:29 PM2023-05-20T19:29:18+5:302023-05-20T19:29:52+5:30
MiG-21 fighter jets: हवाई दलाच्या MIG-21 विमानांचे वारंवार होत असलेले अपघात लक्षात घेत, संपूर्ण ताफ्याच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे.
Air Force grounds MiG-21 fighter jets: उड्डाण करताना वारंवार अपघातांना सामोरे जाणाऱ्या मिग 21 विमानांचा संपूर्ण ताफा भारतीय हवाई दलाने 'ग्राउंड' केला आहे, म्हणजे या विमानांच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. अलीकडेच राजस्थानमध्ये मिग 21 विमान कोसळले होते. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र, ही बंदी कायमस्वरूपी लागू करण्यात आलेली नाही.
राजस्थानमध्ये दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अपघातानंतर भारतीय हवाई दलाने मिग-21 विमानांच्या ताफ्याचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. उच्च सरकारी सूत्रांनी सांगितले की, मिग-21 लढाऊ विमाने 'ग्राउंड' करण्यात आली आहेत कारण 8 मेच्या अपघाताची चौकशी अद्याप सुरू आहे. त्याच्या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.
1963 साली हवाई दलात सामील झाले मिग-21
राजस्थान अपघाताचा अद्याप तपास सुरू असून तोपर्यंत विमानाचे तिन्ही स्क्वाड्रन उडणार नाहीत. मिग प्रकारांचा पहिला ताफा 1963 मध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आला होता आणि त्यानंतरच्या दशकात भारताने 700 हून अधिक मिग-व्हेरियंट विमाने खरेदी केली होती. मिग हे IAF चे सर्वात जुने फायटर जेट फ्लीट आहे. त्याच्या जागी संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 83 तेजस लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत 48,000 कोटींचा करार केला आहे.
मिग-21 चे 400 हून अधिक अपघात
भारतीय वायु दल 114 लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत आहे. 1960च्या दशकाच्या सुरुवातीला हवाई दलात समाविष्ट झाल्यापासून आतापर्यंत 400 हून अधिक वेळा मिग-21 विमानांचे अपघात झाले आहेत.
IAF फेज आउट करणार मिग-21
IAF मध्ये फक्त तीन MiG-21 स्क्वॉड्रन्स कार्यरत आहेत आणि त्या सर्व 2025 च्या सुरुवातीस टप्प्याटप्प्याने बंद केल्या जातील. राजस्थानमध्ये क्रॅश झालेले हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणावर होते तेव्हा ते कोसळले. या अपघातात पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे.आयएएफकडे तीन मिग-21 बायसन प्रकारांसह 31 लढाऊ विमान स्क्वाड्रन्स आहेत.
मिग 21चे गेल्या दोन वर्षांतील मोठे अपघात
- 5 जानेवारी 2021: मिग-21 राजस्थानच्या सुरतगडजवळ क्रॅश झाले. पायलट सुरक्षित.
- 17 मार्च 2021: लढाऊ प्रशिक्षण मोहिमेदरम्यान ग्वाल्हेरजवळ मिग-२१ क्रॅश झाले. यामध्ये ग्रुप कॅप्टन शहीद झाला.
- 21 मे 2021: MiG-21 विमान पंजाबच्या मोगा जिल्ह्यात कोसळले. या अपघातात पायलट शहीद झाला.
- 25 ऑगस्ट 2021: राजस्थानच्या बारमेरजवळ प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळले. पायलट सुरक्षित.
- 24 डिसेंबर 2021: जैसलमेरमध्ये मिग-21 विमानाचा अपघात झाला. यामध्ये पायलट शहीद झाला.
- 28 जुलै 2022: मिग-21 ट्रेनर विमान बारमेरमध्ये कोसळले. दोन्ही पायलट शहीद झाले.