वायुदलाने विदेशातून आणली ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 01:25 AM2021-05-06T01:25:47+5:302021-05-06T01:25:57+5:30
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल.
नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या महाकाय मालवाहू विमानाने (आयएल-७६) बुधवारी सिंगापूर आणि बँकाॅकहून ३५२ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणि क्रायो कंटेनर आणली आहेत. कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाने ऑक्सिजनचा कमालीचा तुटवडा भासत असून यावर मात करण्यासाठी ही सिलिंडर्स आणि कंटेनर आणण्यात आली आहेत.
गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आयएल-७६ दिल्लीसाठी ३५३ रिकामी ऑक्सिजन सिलिंडर्स आणत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या समन्वयाने केल्या जात असलेल्या या प्रयत्नामुळे ऑक्सिजनची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. बँकाॅकहून आणलेली तीन क्रायो सिलिंडर पश्चिम बंगालमधील पनगढ तळाकडे रवाना करण्यात आली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राला १७४, उत्तर प्रदेशला ६४१, मध्य प्रदेशला १९०, हरियाणाला २२९, तेलंगणाला १२३ आणि दिल्लीला ७०७ टन वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचता करण्यात आला आहे. एका ऑक्सिजन एक्स्प्रेस ट्रेनमध्ये १६ टन वैद्यकीय ऑक्सिजन लादलेला असून, या ट्रेन ताशी ६५ किलोमीटर वेगाने धावतात.
ऑक्सिजन एक्स्प्रेसची लक्षणीय कामगिरी
भारतीय रेल्वेच्या ऑक्सिजन एक्स्प्रेसने गेल्या १६ दिवसांत देशभरात २,०६७ टन वैद्यकीय ऑक्सिजन पोहोचता केला. यापैकी दिल्लीला सर्वाधिक ७०७ टन आणि त्यानंतर उत्तर प्रदेशला ६४१ टन ऑक्सिजन मिळाला आहे. सध्या ३४४ टन द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजन असलेले टँकर देशाच्या विविध भागातील मार्गावर आहेत. भारतीय रेल्वेने विविध राज्यांत २,०६७ टन द्रवरूपी वैद्यकीय ऑक्सिजनचे १३७ टँकर पोहोचते केले आहेत. आतापर्यंत ३४ ऑक्सिजन एक्स्प्रेसनी हा साठा पोहोचता करण्यात आला आहे.