भारत पुन्हा करणार बालाकोट उद्ध्वस्त करणाऱ्या 'त्या' बॉम्बची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 01:40 PM2019-05-08T13:40:52+5:302019-05-08T13:43:31+5:30
इस्राईलकडून भारत पुन्हा बॉम्बची खरेदी करणार
नवी दिल्ली: हवाई दलानं एअर स्ट्राइकदरम्यान वापरलेल्या स्पाईस 2000 बॉम्बची पुन्हा एकदा इस्राईलकडून खरेदी करण्यात येणार आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून 26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं बालाकोटमधल्या दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. त्यावेळी हवाई दलानं स्पाईस 2000 बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बनं अचूक निशाणा साधत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.
ताफ्यातील शस्त्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी हवाई दलाकडून स्पाईस 2000 बॉम्बची खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारतीला उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीनं या बॉम्बचा वापर करता येतो. या बॉम्बच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमारतीला भेदण्याची आणि त्यानंतर इमारतीत स्फोट घडवण्याची क्षमता होती. बालाकोटच्या एअर स्ट्राईकमध्ये स्पाईस 2000 बॉम्बनं महत्त्वाची भूमिका बजावली होती. जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्याची कामगिरी स्पाईस 2000 नं यशस्वीरित्या पार पाडली होती.
26 फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज 2000 विमानांनी बालाकोटवर हल्ला चढवला. त्यावेळी विमानांनी स्पाईस 2000 बॉम्ब दहशतवादी तळांवर टाकले. या बॉम्बनं बालाकोटमधील दहशतवाद्यांची प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी इमारत उद्ध्वस्त केली. स्पाईट 2000 नं दहशतवाद्यांच्या इमारतीला भगदाड पाडलं. त्यानंतर तिथे मोठा स्फोट झाला. हवाई दलानं केलेली ही कामगिरी पूर्णपणे यशस्वी झाल्याचं हवाई दल प्रमुखांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.