एअरफोर्स वन भारताकडे रवाना
By Admin | Published: January 25, 2015 02:04 AM2015-01-25T02:04:26+5:302015-01-25T02:04:26+5:30
तीन दिवसीय भारत दौऱ्याकरिता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वॉशिंग्टन येथून शनिवारी रवाना झाले.
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : तीन दिवसीय भारत दौऱ्याकरिता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा वॉशिंग्टन येथून शनिवारी रवाना झाले. नियोजित आग्रा दौरा रद्द करून ते थेट नवी दिल्लीहून सौदी अरेबियाला राजे अब्दुल्ला यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाणार आहेत. दरम्यान, जगप्रसिद्ध ताजमहल पाहण्यापासून आपण मुकणार असल्याबद्दल ओबामा यांनी खंत व्यक्त केली आहे.
नव्या कार्यक्रमानुसार, राष्ट्राध्यक्ष ओबामा व फर्स्ट लेडी मिशेल राजे अब्दुल्ला यांच्याप्रति शोकभावना व्यक्त करण्यासाठी गुरुवारी रियाधला जाऊन राजघराण्याची भेट घेणार आहेत.
भारत सरकारशी समन्वय साधून राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याची नव्याने आखणी करण्यात आल्याचे व्हाइट हाउसकडून सांगण्यात आले. अमेरिकी नागरिकांकडून राजे अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी रियाधला जाण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ओबामांना नियोजित आग्रा भेट रद्द करावी लागली आहे. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे.
दौऱ्यादरम्यान उप राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे वॉशिंग्टनमध्ये राहणार असल्याचेही व्हाइट हाउसच्या निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीतील अमेरिकी वकिलातीने हे निवेदन जारी केले आहे.
तत्पूर्वी अमेरिकी उप राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ ओबामांच्या वतीने शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी सौदीला जाणार होते. राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष दोन्हींपैकी एक नेता देशात राहावा या उद्देशाने ओबामांच्या दौऱ्यात फेरबदल करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
गुरुवारी राजधानी दिल्लीतील सिरी फोर्ट आॅडिटोरिअममधील एका भाषणानंतर बराक ओबामा हे पत्नी मिशेल यांच्यासोबत थेट रियाधला रवाना होतील.