एअरहोस्टेसवर जडलेल्या प्रेमाखातर प्रवाशाने दिली विमान उडवण्याची धमकी, पत्रामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 01:35 PM2017-10-31T13:35:20+5:302017-10-31T13:39:09+5:30
मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या विमानात धमकी देणारं पत्र ठेवणा-या मुंबईच्या बिरजू किशोर सल्ला याला आपली ही मस्करी चांगलीच महागात पडणार आहे
अहमदाबाद - मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या विमानात धमकी देणारं पत्र ठेवणा-या मुंबईच्या बिरजू किशोर सल्ला याला आपली ही मस्करी चांगलीच महागात पडणार आहे. मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलरचा मुलगा असणा-या बिरजूला नो फ्लाईंग लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. ज्यामुळे यापुढे त्याला ट्रेनने प्रवास करावा लागणार आहे. बिरजूच्या या मस्करीमुळे सोमवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) अधिका-यांची झोप उडवली होती. विमानाला आणीबाणी परिस्थितीत अहमदाबाद विमानतळावर लँण्ड करण्यात आलं होतं. प्रवाशाने नेमकं असं का केलं याचा तपास केला असता धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
तपासात निष्पन्न झालं आहे की, बिजनेस क्लासमध्ये प्रवास करणा-या बिरजूनेच हे पत्र ठेवलं होतं. एअरहोस्टेसवर जडलेल्या प्रेमाखातर आपण हे केल्याचा दावा प्रवाशाने केला आहे. तसंच आपल्याला जेट एअरवेजसोबत असलेली जुनी खुन्नस काढायची होती असंही त्याने सांगितलं आहे. एनआयए लवकरच तपास आपल्या हाती घेणार आहे. बिरजूने धमकीचं पत्र लिहिण्यासाठी ज्या कॉम्प्युटरचा वापर केला, आणि ज्या ऑनलाइन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उर्दू भाषेत भाषांतर केलं ते जप्त करण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना झालं आहे.
बिजनेस क्लासमध्ये एकट्याने प्रवास करणा-या बिरजू याच्या हालचाली एअरहोस्टेसने टिपल्या होत्या. धमकीचं पत्र मिळण्याच्या काही वेळ आधी बिरजू बिजनेस क्लासच्या टॉयलेटमध्ये गेला होता. सीसीटीव्हीमधूनही हे निष्पन्न झालं. बिरजू याने आपल्यावरील आरोप मान्य केले असल्याचं अहमदाबाद क्राइम ब्रांचच्या एका अधिका-याने सांगितलं आहे.
बोईंग 737-900 विमानाने सोमवारी तीन वाजता 115 प्रवाशांसहित मुंबई - दिल्लीसाठी प्रवास सुरु केला होता. यानंतर विमानातील एका क्रू मेम्बरला एक पत्र मिळालं होतं. पत्रात लिहिलं होतं की, 'विमानाला थेट पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जा. विमानात आता 12 अपहरणकर्ता प्रवास करत आहेत. जर विमानाला दिल्लीत उतरवलं तर कार्गोत ठेवलेला बॉम्ब फुटेल'.
यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ सुरु झाली होती. पाच वाजून 30 मिनिटांनी विमानाचं एमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आलं. हायजॅकच्या भीतीने मुंबई, अहमदाबाद आणि दिल्ली विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र नंतर या धमकीचं सत्य समोर आलं. चौकशी केला असता, बिरजूने विमानातील एअरहोस्टेसच्या प्रेमाखातर हे कृत्य केलं. सध्या आरोपी सीआयडी कस्टडीत असून, त्याला नो फ्लाईंग लिस्टमध्ये टाकलं जाऊ शकतं.