टाटा विकत घेणार आजारी एअर इंडिया?
By admin | Published: June 22, 2017 05:53 AM2017-06-22T05:53:42+5:302017-06-22T05:53:42+5:30
सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी
विशेष प्रतिनिधी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आणि १० वर्षे तोट्यात असलेली ‘एअर इंडिया’ ही राष्ट्रीय विमान कंपनी विकत घेण्यात टाटा उद्योग समूहाने स्वारस्य दाखविले असल्याचे वृत्त आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनेने हे वृत्त देताना म्हटले की, सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर इंडियाचे ५१ टक्के भागभांडवल खरेदी करून ही विमान कंपनी ताब्यात घेण्याच्या इराद्याने टाटा समूहाने हालचाली सुरू केल्या आहेत. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सरकारी पातळीवर प्राथमिक स्वरूपाची बोलणीही केली आहेत.
खासगी विमान कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव धरू न शकलेल्या एअर
इंडियाचा कारभार रुळावर आणण्यासाठी सरकारने कंपनीला ३० हजार कोटी रुपये देण्याचे ठरविले. त्यापैकी २४ हजार कोटी रुपये दिलेही आहेत. तरीही गळक्या हौदात पाणी ओतत राहून उपयोग नसल्याची सरकारला खात्री पटल्याने, वित्तमंत्री अरुण जेटली व विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचा विचार बोलून दाखविला आहे. एअर इंडियाचे मोठे कर्ज हा टाटांसाठीही काळजीचा विषय आहे, पण टाटांसारखा उद्योगसमूह सुकाणू हाती घेणार असल्यास, विक्रीपूर्वी हा बोजा कमी करण्यावरही सरकार अनुकूल असल्याचे समजते.
सिंगापूर एअरलाइन्स आणि मलेशियाची एअर एशिया यांच्या भागीदारीत अनुक्रमे ‘विस्तारा’ व ‘एअर एशिया इंडिया’ कंपन्या सुरू करून, टाटा समूह भारताच्या नागरी विमान वाहतूक उद्योगात शिरला आहेच.
वर्तुळाचे पूर्णचक्र!
एअर इंडिया खरेच टाटांकडे आल्यास ही कंपनी सुमारे ७० वर्षांनी मूळ मालकाकडे परत येईल. या कंपनीचा ‘टाटा एअरलाइन्स’हा अवतार जेआरडी टाटांनी १९३२मध्ये सुरू केला.
स्वातंत्र्यानंतर हीच कंपनी सरकार व खासगी भागीदारीत ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ झाली. नंतर सरकारने विमान वाहतूक उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्याने, ‘एअर इंडिया’ सरकारी झाल्याने टाटा त्यातून बाहेर पडले.
गेल्या १० वर्षांत एअर इंडियाची प्रवासीसंख्या २० टक्क्यांनी कमी झाली असली, तरी अजूनही त्यांचा वाटा १४ टक्क्यांचा आहे. टाटांना ही जमेची बाजू वाटते. निष्णात व्यावसायिक व्यवस्थापनाची जोड देऊन ही कंपनी चालविल्यास सौदा नफ्याचा ठरू शकेल, असेही टाटांना वाटते.