एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची बोली १५ सप्टेंबरपर्यंत - ज्योतिरादित्य शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:38 AM2021-08-20T05:38:11+5:302021-08-20T05:38:45+5:30
Jyotiraditya Scindia : शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत.
- अभिलाष खांडेकर
इंदूर : एअर इंडियाचे निगुंर्तवणूक करण्याची प्रक्रिया योग्य मार्गावर असून विक्रीसाठी १५ सप्टेंबरच्या आसपास बोली सादर झाल्यानंतर अन्य संंबंधित प्रक्रिया पूर्ण करुन अत्यंत पारदर्शक पद्धतीने तोट्यातील एअर इंडियाची विक्री केली जाईल, असे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी सांगितले; परंतु, त्यांनी बोलीधारकांचे नाव उघड करण्यास नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात हवाई संपर्क वाढवून आणि प्रवास दर कमी करुन खऱ्या अर्थाने नागरी उड्डयण क्षेत्राचे लोकशाहीकरण केले, असे ते म्हणाले.
शिंदे हे जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात इंदूरमध्ये होते. विमान प्रवाशांसाठी सुविधा वाढवून मध्य प्रदेशातील विमानतळे अनेक प्रकारे अद्ययावत केली जात आहेत. सामान्य व्यक्तीलाही देशांतर्गत हवाई प्रवास करता यावा आणि अद्वितीय उड्डाण योजना यशस्वी करण्याचा उद्देश पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करीत आहेत.
३१४ नवी उड्डाणे : नागरी उड्डयन मंत्रालयाचा पदभार घेतल्यापासून ७५ दिवसांत इंदूर, भोपाळ, जबलपूर, ग्वाल्हेर आणि खुजुराहोत ३१४ नवीन उड्डाणे सुरु करण्यात आली. इंदूर विमानतळ वर्दळीचे असल्याने विस्तारीकरणासाठी जमीन लागणार आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना २३०० एकर जमीन उपलब्ध करुन देण्याची विनंती केली.