बापरे! उड्डाण करताच हवेतच बंद पडलं Air India च्या विमानाचं इंजिन; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 02:23 PM2022-05-20T14:23:32+5:302022-05-20T14:24:42+5:30
Air India : एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं आहे.
नवी दिल्ली - टाटा समूहाद्वारे संचालित एअर इंडियाच्या (Air India) A320neo विमानाचं इंजिन गुरुवारी काही तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलं. त्यानंतर मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उड्डाण करताच हवेतच विमानाचं इंजिन बंद पडलं. त्यानंतर 27 मिनिटांनी मुंबई विमानतळावर ते परतले. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बंगळुरू (Bangalore) येथे नेण्यात आल्याचं म्हटलं आहे.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूला जाणाऱ्या या विमानातील प्रवाशांना गुरुवारी दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आलं आहे. हवाई वाहतूक नियामक महासंचालक नागरी विमान वाहतूक या घटनेची चौकशी करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एअर इंडियाच्या A320neo विमानांमध्ये CFM लीप इंजिन बसवलेले आहेत.
A320neo विमानाने सकाळी 9.43 वाजता छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले. पण उड्डाणानंतर काही मिनिटांत विमानाच्या वैमानिकांना विमानाच्या इंजिनामध्ये काहीतरी बिघाड झाल्याची मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजिन बंद झाल्यानंतर पायलटने सकाळी 10.10 वाजता विमान पुन्हा मुंबई विमानतळावर उतरवले.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, एअर इंडिया सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते आणि आमचे क्रू या परिस्थिती हाताळण्यात पारंगत आहेत. आमच्या अभियांत्रिकी आणि देखभाल कार्यसंघांनी ताबडतोब या समस्येकडे लक्ष देणे सुरू केलं, ज्यामुळे आपत्कालीन लँडिंग झाले. तसेच विमान बदलल्यानंतर प्रवाशांना बंगळुरूला पाठवण्यात आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.