पाच वर्षांत मोदींचे रेकॉर्डब्रेक परदेश दौरे; पण खर्च मनमोहन सिंगांपेक्षा कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:36 PM2019-04-08T19:36:12+5:302019-04-08T19:39:04+5:30
मोदींच्या 44 परदेश दौऱ्यावर 443.4 कोटी रुपयांचा खर्च
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर 443.4 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. याबद्दलचं बिल एअर इंडियानं पंतप्रधान कार्यालयाला पाठवलं आहे. मात्र यामध्ये एअर इंडियानं मोदींच्या पाच परदेश दौऱ्यांच्या खर्चाचा समावेश केलेला नाही. मोदींनी मे 2014 पासून 44 आंतरराष्ट्रीय दौरे केले. याआधी कोणत्याही पंतप्रधानानं मोदींइतके परदेश दौरे केलेले नाहीत, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयानं दिली.
पंतप्रधान मोदी या महिन्याच्या अखेरीस संयुक्त अरब अमिरातला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त अरब अमिरातनं नुकताच मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान घोषित केला. दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींना हा सन्मान देण्यात येणार आहे. त्यासाठी मोदी महिन्याच्या शेवटी संयुक्त अरब अमिरातला जाऊ शकतात. मोदींनी सर्वाधिक परदेश दौरे केले असले, तरी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या तुलनेत त्यांच्या दौऱ्यांचा खर्च कमी आहे. मनमोहन सिंग यांनी 2009 ते 2014 या कालावधीत 38 परदेश दौरे केले. यासाठी 493.22 कोटी रुपयांचा खर्च आला. मोदींच्या परदेश दौऱ्याच्या तुलनेत हा खर्च 50 कोटींनी जास्त आहे.
मोदींनी एकाचवेळी अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. एकदा प्रवास सुरू झाल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परततात. त्यामुळेच त्यांनी जास्त देशांना भेटी देऊनही त्यांच्या प्रवासावरील खर्च कमी आहे. 2015 मध्ये मोदींनी एकाच दौऱ्यात उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तानला भेटी दिल्या होत्या. मोदींनी त्यांच्या 16 पेक्षा अधिक दौऱ्यांमध्ये एकाहून जास्त देशांना भेटी दिल्या.
मोदींनी सहा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांसाठी भारतीय हवाई दलाचं बिझनेस जेट (बोईंग 737) वापरलं. या दौऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च आला नाही. मोदी हवाई दलाच्या बोईंग 737नं नेपाळ, इराण, बांग्लादेश आणि सिंगापूरला गेले होते. व्हीव्हीआयपींसाठी हे विमान वापरलं जातं. याउलट सिंग यांच्या कार्यकाळात एअर इंडिया वनचा वापर बांगलादेश, सिंगापूरसारख्या कमी अंतराच्या प्रवासासाठीही करण्यात आला होता.