एअर इंडियाने १९ विद्यार्थ्यांना अमेरिकेत जाण्यापासून रोखले
By admin | Published: December 22, 2015 11:45 AM2015-12-22T11:45:33+5:302015-12-22T11:54:54+5:30
अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे चाललेल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाने आपल्या विमानात बसण्यापासून रोखले.
ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २२ - अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्कोला चाललेल्या १९ भारतीय विद्यार्थ्यांना एअर इंडियाने आपल्या विमानात बसण्यापासून रोखले. रविवारी रात्री हैदराबाद विमानतळावर ही घटना घडली. या विद्यार्थ्यांनी सॅनफ्रान्सिस्कोतील ज्या दोन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला आहे त्या विद्यापीठांची चौकशी सुरु असल्याचे अमेरिकन प्रशासनाने कळवले होते.
अमेरिकत जाऊन विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांना रोखल्याचे स्पष्टीकरण एअर इंडियाने दिले. याआधी सॅनफ्रान्सिस्कोतील त्या दोन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या १४ विद्यार्थ्यांना माघारी धाडण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली. त्यांनी सुद्धा एअर इंडियाच्या विमानाने प्रवास केला होता.
आम्हाला अमेरिकन प्रशासनाने रीतसर व्हिसा मंजूर केला होता. त्या विद्यापीठांना काळया यादीत टाकले आहे तर व्हिसा का मंजूर केला ? आम्हाला गुन्हेगारांसारखी वागणूक दिली आणि परत पाठवले अशी प्रतिक्रिया अमेरिकेतून माघारी आलेल्या एका विद्यार्थ्याने दिली.
सॅन जोसेमध्ये सिलिकॉन व्हॅली आणि नॉर्थ वेस्टन पॉलिटेक्निक कॉलेजची चौकशी सुरु असल्याची माहिती अमेरिकन कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन एजन्सीने आम्हाला दिली होती. या दोन विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सॅनफ्रान्सिस्को विमानतळांवरुन माघारी धाडण्यात आल्याची माहिती अमेरिकन एजन्सीने दिली होती असे एअर इंडियाने सांगितले.