Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 01:17 PM2020-08-09T13:17:05+5:302020-08-09T13:19:33+5:30
त्या चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बचावकार्य राबवलं असता अखेर ती सापडली. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही तिला काही झालेलं नाही.
तिरुअनंतपूरम : केरळमधील कोझिकोडमधल्या भीषण विमान अपघाताने (Air India Express Crash) देशभरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 14 प्रवाशांना जीवानिशी जावं लागलं आहे. तसेच १२३हून अधिक प्रवासी जखमी आहेत. या जखमी प्रवाशांमध्ये एक लहान मुलगी बचावली आहे, सध्या तीच चर्चेचा विषय ठरत आहे. एवढ्या भीषण अपघातामधून तिची आणि पालकांची चुकामूक झाली होती. त्या चिमुकलीला शोधण्यासाठी पोलिसांनी बचावकार्य राबवलं असता अखेर ती सापडली. विशेष म्हणजे एवढ्या भीषण अपघातातही तिला काही झालेलं नाही.
विमानतळावर अपघातानंतर हरवलेल्या मुलीच्या शोधासाठी पालकांचा जीव कासावीस झाला होता. नंतर काही तासांमध्येच ती आपल्या पालकांकडे पोहोचली आणि सगळ्यांची जीव भांड्यात पडला. विशेष म्हणजे त्या चिमुकलीचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेले होते. ती सुखरूप मिळावी यासाठी नेटकऱ्यांनी प्रार्थना केली होती. कोझिकोडेचा विमानतळ ‘टेबलटॉप’ म्हणजे डोंगरमाथ्यावर असलेल्या व धावपट्टीच्या दोन्ही बाजूंस दरी असलेला आहे. येथे धावपट्टीवरून धावताना विमान घसरून मोठा अपघात होण्याचा धोका आहे, असा इशारा हवाई वाहतूक सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ गेली अनेक वर्षे देत आले आहेत. अधिकृत माहितीनुसार शनिवार सायंकाळपर्यंत या अपघातातील मृतांचा आकडा १९ वर पोहोचला.
A little child was found alone at the accident site. She's being taken to the Kondotty hospital. If anyone knows her, contact 9048769169 #Kerala#Calicutpic.twitter.com/bg642ouNO8
— Megastar Addicts (@MegastarAddicts) August 7, 2020
१४९ जखमींपैकी २३ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यापैकी तिघे व्हेंटिलेटरवर आहेत. २३ जखमींना उपचारांनंतर घरी पाठविण्यात आले आहे.जखमींवर कोझिकोडे व मल्लापुरम येथील इस्पितळांमध्ये उपचार सुरु आहेत. मृत्यू पावलेले वैमानिक कॅ. दीपक वसंत साठे व सहवैमानिक अखिलेश शर्मा यांच्या कुटुंबियांना विमान कंपनीने येथे आणण्याची व्यवस्था केली. उत्तरीय तपासणीनंतर दोघांचेही मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केले गेले.
अपघातातील मृतांच्या कुटुंबांना केंद्र व केरळ सरकारने मिळून एकूण प्रत्येकी २० लाख रुपयांची मदत जाहीर केली. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीप सिंग पुरी व केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी यासंबंधीच्या घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपये तर किरकोळ जखमींना ५० हजार रुपये दिले जातील. केरळ सरकार मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये देईल. शिवाय सर्व जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च करेल.