Air India Sale : एअर इंडियाची विक्री देशविरोधी, त्याविरोधात कोर्टात जाईन - सुब्रह्मण्यम स्वामी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 02:49 PM2020-01-27T14:49:34+5:302020-01-27T14:50:54+5:30
Air India Sale : प्रचंड कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली - प्रचंड कर्जामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने तयारी सुरू केली आहे. मात्र भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सरकारच्या या निर्णयावर सडकून टीका केली आहे. एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय हा देशविरोधी आहे. त्याविरोधात मी न्यायालयात धाव घेणार आहे, असे स्वामी यांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना स्वामी म्हणाले की, एअर इंडियाची विक्री करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. हा करार पूर्णपणे देशविरोधी आहे. नाईलाजास्तव मला कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. आम्ही आपल्या कुटुंबाची सामूहिक संपत्ती अशा प्रकारे विकू शकत नाही.
केंद्र सरकारने सरकारी विमान कंपनी असलेल्या एअर इंडियाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा निविदा मागवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकराने एअर इंडियामधील 100 टक्के समभाव विकणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने एअर इंडियाच्या खासगीकरणाला 7 जानेवारी रोजी मंजुरी दिली होती. एअर इंडियाकडे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहेत. आता 17 मार्चपर्यंत एअर इंडियासाठी बोली लावता येणार आहे.