धक्कादायक ! एअर इंडियाच्या वरिष्ठ पायलटने ऑस्ट्रेलियात केली चोरी; निलंबनाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:04 PM2019-06-23T17:04:05+5:302019-06-23T17:10:06+5:30
एअर इंडियाच्या संचालक अमृता शरण यांनी हे निलंबन केले आहे.
नवी दिल्ली : सरकारी कंपनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असतानाही सिडनीच्या विमानतळावरील एका करमुक्त दुकानामध्ये विमानाच्या कॅप्टनने पाकिट चोरी केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या कॅप्टनला एअर इंडियाने निलंबित केले आहे.
एअर इंडियाच्या संचालक अमृता शरण यांनी हे निलंबन केले आहे. त्यांनी सांगितले की, ऑस्ट्रेलियाच्या विभागीय व्यवस्थापकाने सांगितले की एअर इंडियाचा पायलट रोहिच भसीन याने विमनतळावरील ड्युटी फ्री दुकानातून किंमती पाकिट चोरी केले आहे. हे विमान शनिवारी दिल्लीला उड्डाण करणार होते. यामुळे भसीनला निलंबित करण्यात आले आहे.
भसीन एअर इंडियाचे विमान घेऊन दिल्लीला उड्डाण करणार होते. तेवढ्यात त्यांना आजोबा झाल्याचा फोन आला. यानंतर ते विमानतळावरील दुकानात भेटवस्तू घेण्यासाठी गेले होते. आजोबा बनल्याची बातमी मिळताच खूश झालो होतो. यामुळे विमान घेऊन जाण्याआधी मोठ्या सुनेला भेटवस्तू घेण्यासाठी त्या दुकानात गेलो होतो. मात्र, घाईत असल्याने पाकिटाचे पैसे देण्यास विसरलो. विमानात आल्यानंतर माझ्या ही बाब लक्षात आली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. कारण विमान उड्डाणास तयार झाले होते, असे भसीन यांनी सांगितले.
निलंबनाच्या आदेशामध्ये भसीनवर आणखी प्रतिबंध लादण्यात आले आहेत. परवानगीशिवाय भसीन एअर इंडियाच्या परिसरात प्रवेश करू शकणार नाही. तसेच लिखीत परवानगीशिवाय त्यांचे कामाचे ठिकाण कोलकाता सोडता येणार नाही. एअर इंडियाकडे ओळखपत्र जमा करावे लागेल. तसेच निर्वाह भत्त्याशिवाय कोणतीही रक्कम दिली जाणार नाही.
या प्रकरणी एअर इंडियाने खुलासा दिला आहे. एअर इंडिया विमानांच्या संचलनावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. यामुळे कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. प्राथिमिक माहितीनुसार रोहित भसीन नावाच्या पायलटने सिडनीच्या दुकानातून साहित्य घेतले आहे. कंपनीने चौकशी सुरु केली असून पायलटला निलंबित केले आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.