Air India: टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:47 PM2022-03-14T19:47:59+5:302022-03-14T19:49:02+5:30
टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत.
नवी दिल्ली :टाटा समूहाने नटराजन चंद्रशेखरन यांची एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. टाटा सन्सने एका निवेदनात म्हटले की, ''संचालक मंडळाने चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीची पुष्टी केली आहे. टाटा सन्सच्या संचालक मंडळाने, 11 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या बैठकीत गेल्या पाच वर्षांचा आढावा घेतला आणि एन चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला," असे निवेदनात म्हटले आहे. तत्पूर्वी, 14 फेब्रुवारी रोजी, टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी प्रमुख इल्कर यांची एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्तीची घोषणा केली होती, परंतु इल्करने ही ऑफर नाकारली.
टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत 100 हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत. ऑक्टोबर 2016 मध्ये ते टाटा सन्सच्या बोर्डात सामील झाले आणि जानेवारी 2017 मध्ये त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ते टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यासह विविध समूह ऑपरेटिंग कंपन्यांच्या मंडळाचे प्रमुख देखील आहेत. चंद्रशेखरन हे टाटा समूहाचे प्रमुख असलेले पहिले गैर-पारशी आणि व्यावसायिक कार्यकारी आहेत.
एअर इंडियात येण्यास इल्कर आयसी यांचा नकार
तुर्कीश एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांनी एअर इंडियाचे सीईओ होण्याची ऑफर नाकारली. एका अधिकृत निवेदनाद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. एअर इंडियाने दिलेली ही ऑफर आपण सध्याच्या स्थितीमध्ये स्वीकारू शकत नाही. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्डोगन हे पाकिस्तानचे जवळचे मित्र आहेत. त्यांचे सल्लागार राहिलेले आयसी यांची काश्मीरबाबतची काही मते असल्याबद्दल आलेल्या बातम्यांमुळे आयसी यांनी हे पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.