Air India ने प्रवास करायचाय? ३ तास आधी चेक-इन करा
By Admin | Published: January 12, 2016 01:02 PM2016-01-12T13:02:21+5:302016-01-12T13:57:22+5:30
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एअर इंडियाने यापुढे प्रवाशांना विमान उड्डाणाच्या ३ तास आधीच चेक-इन करण्याची सूचना केली आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - पंजाबच्या पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेला दहशतवादी हल्ला आणि अवघ्या काही दिवसांवर आलेला प्रजासत्ताक दिन यांच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व विमानतळांवरील सुरक्षा बंदोबस्त आणखी कडेकोट करण्यात आला आहे. एअर इंडिया कंपनीनेही सुरक्षेचा एक भाग म्हणून यापुढे सर्व प्रवाशांना विमानाच्या उड्डाणापूर्वी ३ तास आधीच विमानतळावर चेक-इन करण्याची सूचना केली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच उड्डाणासाठी विलंब होऊ नये यासाठी हा नवा नियम बनवण्यात आला आहे.
तुम्हाला जर देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर ७५ मिनिटे आधी चेक-इन करावं लागतं तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी हाच कालावधी १५० मिनिटे इतका आहे. मात्र आता एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करताना तुम्हाला तब्बल ३ तास आधीच चेक-इन करावे लागेल. एका पत्रकाद्वारे एअर इंडियाने प्रवाशांना हे आवाहन केले आहे.