नारीशक्तीला एअर इंडिया करणार अनोखा सलाम
By admin | Published: March 6, 2016 03:37 AM2016-03-06T03:37:03+5:302016-03-06T03:37:03+5:30
८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असून, त्याच्या दोन दिवस आधी एअर इंडियाकडून नारीशक्तीला अनोख्या पद्धतीने सलाम करण्यात येणार आहे. ६ मार्चला एअर इंडियाचे विमान दिल्लीहून उड्डाण
मुंबई : ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा होत असून, त्याच्या दोन दिवस आधी एअर इंडियाकडून नारीशक्तीला अनोख्या पद्धतीने सलाम करण्यात येणार आहे. ६ मार्चला एअर इंडियाचे विमान दिल्लीहून उड्डाण करून सॅन फ्रॅन्सिस्कोचा सर्वांत लांब हवाई पल्ला गाठणार आहे आणि या विमानातील वैमानिकासह सर्व कर्मचारी दल महिलाच असणार आहेत, हे विशेष.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीचा महिला दिन एअर इंडियाने वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. दिल्लीहून सॅन फ्रॅन्सिस्कोला जाणाऱ्या विमानातील चारही वैमानिक व इतर कर्मचारी महिला असण्याबरोबरच फ्लाईट डिस्पॅचर व फ्लाईट इंजिनीअरही महिलाच असतील. एवढेच नव्हे, तर लाईन सेफ्टी महिलेकडून केली जाणार आहे, तसेच चिफ फ्लाईट सेफ्टी (एअर इंडिया) हरप्रीत एडी सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सेफ्टी आॅडिट करण्यात येणार आहे. हेही कमी म्हणून की काय विमानावरील लोड आणि ट्रिम स्टाफही महिलाच असावा, अशीही योजना करण्यात आली आहे.
दरवर्षी आम्ही विमानांसाठी महिला कर्मचारी सज्ज करून महिला दिन साजरा करीत असतो. या वर्षी मात्र प्रथमच थोडा वेगळा विचार करून सर्वांत लांब हवाई पल्ल्याच्या विमानाचा कर्मचारी दल संपूर्णपणे महिलाच ठेवण्याचे ठरविले आहे. या कामगिरीनंतर अर्थातच त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे, असे सिंग यांनी सांगितले. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी एअर इंडियाची महिला वैमानिक संघटनेशी चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
मागील वर्षी महिला दिनानिमित्त एअर इंडियाने संपूर्ण महिला कर्मचारी दल असलेली चार आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत विमाने चालवली होती. दिल्ली-मेलबॉर्न आणि मुंबई-मस्कत-मुंबई ही आंतरराष्ट्रीय विमाने व मुंबई-दिल्ली आणि दिल्ली-जोधपूर-मुंबई ही विमाने मागील वर्षी पूर्णपणे महिलांनीच संचलित केली होती.