एअर इंडियाचा भोंगळ कारभार, आसन संख्येपेक्षा अधिकची तिकिटं दिल्यानं प्रवाशांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 10:39 AM2019-06-06T10:39:40+5:302019-06-06T10:54:51+5:30
एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नवी दिल्लीः एअर इंडियाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. एअर इंडिया या विमान कंपनीनं दिल्ली-गुवाहाटी या विमानानं प्रवास करणाऱ्या 20 प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यास नकार दिला आहे. विशेष म्हणजे बोर्डिंग पास देण्यास नकार दिलेल्या त्या प्रवाशांकडे कन्फर्म तिकीट होते. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियानं प्रवासी आसन व्यवस्थेहून अधिक तिकिटं बुक केली आहेत. त्यामुळे ऊर्वरित प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आलेला नाही. बोर्डिंग पास न दिल्यानं प्रवाशांनी एअरपोर्टवरच घोषणाबाजी सुरू केली. त्या प्रवाशांवर आता तिकीट रद्द करण्याचा दबाव टाकला जातोय.
#Delhi: Over 20 passengers travelling on Air India Delhi-Guwahati flight today were denied boarding passes as the flight was overbooked, claims passengers. pic.twitter.com/dAvlZMZ2B7
— ANI (@ANI) June 5, 2019
तर गेल्या काही दिवसांपूर्वी एअर इंडियाने शेवटच्या क्षणी होणा-या तिकीट बुकिंगसाठी मोठी सूट अधिकृतरीत्या जाहीर केली होती. एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली होती. सवलतीचा नेमका आकडा निवेदनात देण्यात आलेला नाही. तथापि एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी होणा-या बुकिंगवर एअर इंडियाकडून सरसकट 50 टक्के सूट देण्यात येत होती. जेट एअरवेज जमिनीवर आल्यानंतर विमान तिकिटे प्रचंड महागली आहेत. ऐनवेळच्या प्रवासासाठी तर विमान कंपन्या अवाच्या सव्वा दर आकारत आहेत. या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या हंगामात ही प्रवाशांसाठी बंपर ऑफर ठरत होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, शेवटच्या क्षणी केल्या जाणा-या विमान तिकिटाच्या बुकिंगवर प्रवाशांना सामान्यत: सुमारे 40 टक्के जास्त पैसे मोजावे लागतात. काही कंपन्या तर त्यापेक्षाही जास्त रक्कम आकारतात. जेट एअरवेज बंद पडल्यानंतर तिकिटांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात घसरली आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात नेहमीच्या तफावतीपेक्षा अधिक तफावत निर्माण झाली आहे.