हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:09 PM2024-09-21T16:09:22+5:302024-09-21T16:10:00+5:30
Air Marshal Amar Preet Singh : एअर मार्शल अमरप्रीत सिंग ३० सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत.
Air Marshal Amar Preet Singh appointed as next IAF chief : नवी दिल्ली : एअर मार्शल अमरप्रीत सिंग आता भारतीय हवाई दलाची कमान सांभाळणार आहेत. सरकारने अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी यांच्यानंतर आता अमरप्रीत सिंग हे पदभार स्वीकारतील. सध्या अमरप्रीत सिंग हे हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
एअर मार्शल अमरप्रीत सिंग ३० सप्टेंबर रोजी हवाई दल प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत. सध्याचे हवाई दल प्रमुख व्हीआर चौधरी हे ३० सप्टेंबरला पदावरून निवृत्त होणार आहेत. अमरप्रीत सिंग यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. १ फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांची हवाई दलाचे ४७ वे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी १९८४ मध्ये हवाई दलात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी इस्टर्न एअर कमांडमध्ये वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी म्हणून काम केले, त्यानंतर त्यांनी सेंट्रल एअर कमांडचेही नेतृत्व केले. अमरप्रीत सिंग यांनी आपल्या सेवेत चांगली कामगिरी केली आहे. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या
एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी आपल्या कारकिर्दीत फ्लाइट कमांडर, मिग-२७ स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर तसेच एअर बेसचे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते राष्ट्रीय उड्डाण चाचणी केंद्रात प्रकल्प संचालक (उड्डाण चाचणी) देखील होते आणि त्यांच्याकडे तेजस या हलक्या लढाऊ विमानाच्या उड्डाण चाचणीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दरम्यान, एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी, वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले आहे.
कोणत्या पदकांनी सन्मानित करण्यात आले?
एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांना त्यांच्या कारकिर्दीत अनेक पदके मिळाली. त्यांना २०१९ मध्ये अति विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले, त्यानंतर २०२३ मध्ये त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देखील देण्यात आले.