एअर मार्शल शैलेश देव हवाई दलाचे उपप्रमुख
By admin | Published: January 3, 2017 03:59 AM2017-01-03T03:59:21+5:302017-01-03T03:59:21+5:30
नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी.देव यांनी येथील ‘वायू भवन’ मुख्यालयात सोमवारी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली.
नवी दिल्ली : नागपूरचे सुपुत्र असलेले एअर मार्शल शैलेश बी.देव यांनी येथील ‘वायू भवन’ मुख्यालयात सोमवारी भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. पदग्रहणाआधी त्यांनी इंडिया गेटवर जाऊन ‘अमर जवान ज्योती’ येथे आदरांजली वाहिली. नंतर त्यांना समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली.
लढाऊ वैमानिक म्हणून हवाई दलात दाखल झालेल्या एअर मार्शल देव यांनी अनेक महत्वाची पदे भूषविली. उपप्रमुख होण्याआधी ते हवाई दलाच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. ३७ वर्षांच्या सेवेत बजावलेली गुणवत्तापूर्वक सेवा आणि उत्तम व्यावसायिक कौशल्य या बद्दल राष्ट्रपतींनी त्यांचा ‘परम विशिष्ठ सेवा मेडल’, ‘अति विशिष्ठ सेवा मेडल’, ‘वायू सेना मेडल’ आणि ‘विशिष्ठ सेवा मेडल’ देऊन गौरव केला आहे. राष्ट्रपतींचे ‘एडीसी’ म्हणून काम करण्याचा बहुमानही त्यांना मिळाला.
एअर मार्शल देव यांचा मुलगाही हवाई दलात लढाऊ वैमानिक आहे. योगायोग असा की देव यांचे धाकटे बंधू रोहित देव यांची गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल म्हणून नेमणूक झाली आहे.