...तर 'त्या' भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी घटणार; महाराष्ट्रासाठी परिस्थिती आणखी चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 02:13 PM2021-09-01T14:13:59+5:302021-09-01T14:14:19+5:30
वायू प्रदूषणाचा थेट परिणाम आरोग्यावर; तब्बल ४८ कोटी भारतीयांच्या प्रकृतीवर परिणाम
नवी दिल्ली: जगातील वायू प्रदूषणाचं प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. याचा थेट परिणाम पर्यावरण आणि माणसाच्या आरोग्यावर होत आहे. वायू प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य कमी होण्याची भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. अमेरिकेतील संशोधक गटानं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. वायू प्रदूषणामुळे ४० टक्के भारतीयांचं आयुष्य ९ वर्षांनी कमी होऊ शकतं, अशी भीती संशोधक गटाकडून वर्तवण्यात आली आहे.
शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटनं (ईपीआयसी) वायू प्रदूषण आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबद्दलचा अहवाल तयार केला आहे. त्यानुसार मध्य, पूर्व आणि उत्तर भारतात राहणारे तब्बल ४८ कोटी लोक वायू प्रदूषणाचा सामना करत आहेत. या वायू प्रदूषणाचं स्वरुप गंभीर आहे. भौगोलिक स्थिती विचारात घेतल्यास वायू प्रदूषणाचं प्रमाण वेगानं वाढत असल्याची माहिती अहवालात आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हवेचा दर्जा वेगानं घसरत असल्याचं अहवाल सांगतो.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी २०१९ मध्ये स्वच्छ हवा अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाचं अहवालातून कौतुक करण्यात आलं आहे. या अभियानाच्या अंतर्गत ठेवण्यात आलेली लक्ष्य पूर्ण झाल्यास देशातील नागरिकांचं आयुमान १.७ वर्षांनी, तर दिल्लीतल्या नागरिकांचं आयुष्य ३.१ वर्षांनी वाढेल. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतल्या प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे.
औद्योगिक उत्सर्जन आणि वाहनातून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ हवा अभियान सुरू करण्यात आलं. वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्याच्या उद्देशानं अभियानाची सुरुवात करण्यात आली. २०२४ पर्यंत देशातील १०२ शहरांतील प्रदूषण २० ते ३० टक्के कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे.