कोरोना नाही तरीही भारतात दरदिवशी होतात ६५०० मृत्यू; ताज्या रिपोर्टनं खळबळ उडाली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:54 AM2022-05-18T10:54:59+5:302022-05-18T10:55:54+5:30
हवेच्या प्रदूषणामुळे भारतात २०१९ मध्ये १७ लाख तर चीनमध्ये १८ लाख मृत्यू झाले.
कोरोना महामारी जेव्हा पीकवर होती तेव्हा आपल्या देशात दिवसाला ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचं समोर आले होते. या महामारीनं असे दिवस लोकांसमोर उभे केले. जे आठवून आजही अंगावर काटा येत आहे. परंतु कोरोना नाही तरी भारतात दिवसाला ६ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्याला कारणही अतिशय भयंकर आहे ज्याचा आपण विचारही करत नाही.
या मृत्यूचं कारण आहे प्रदूषण. लोक प्रदूषणाला खूप हलक्यात घेतात आणि त्याची जबाबदारी सरकारवर झटकून टाकतात. प्रदूषण आणि आरोग्य याबाबत लांसेट आयोगाच्या ताज्या रिपोर्टनं खळबळ माजली आहे. त्यानुसार जगातील ६ पैकी १ मृत्यू वेगवेगळ्या प्रदूषणामुळे होत असल्याचं सांगण्यात आले आहे. २०१९ मध्ये भारतात प्रदूषणामुळे २४ लाख, चीनमध्ये २२ लाख तर जगात एकूण ९० लाख मृत्यू झाल्याचं आढळलं आहे. Lancet चा अंदाज वर्तवतो की, २०१९ मध्ये हवा, पाणी आणि व्यवसायासंबंधित प्रदूषणामुळे जगात ९० लाख मृत्यू झालेत.
जलवायू परिवर्तनावर अनेक बड्या चर्चा झाल्या तरी २०१५ पासून मागील आकडेवारीचा विचार करता अद्याप मृत्यूमध्ये अंतर आले नाही. भारतात प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. परंतु १५ देशांच्या तुलनेने डेथ रेट कमी आहे. लांसेट रिपोर्टमध्ये १ लाखांच्या लोकसंख्येवर १६९.५ मृत्यूसह भारत १६ व्या स्थानी आहे. चीनमध्ये २०१५ साली प्रदूषणामुळे १८ लाख लोकांचा मृत्यू झाला होता तर २०१९ मध्ये मृत्यूंचा आकड्यात वाढ होऊन २१.७ लाखांपर्यंत पोहचला. भारतात वायू प्रदूषण सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. २०१९ मध्ये वायू प्रदूषणामुळे १६ लाख, जल प्रदूषणामुळे ५ लाख तर व्यवसायांमुळे होणारे प्रदूषणामुळे १.६ लाख मृत्यू झाले.
हवेच्या प्रदूषणामुळे भारतात २०१९ मध्ये १७ लाख तर चीनमध्ये १८ लाख मृत्यू झाले. दिल्लीतील नॅच्युरल रिसोर्स डिफेंन्स काऊन्सिलचे पोलाश मुखर्जी म्हणाले की, केवळ दिल्लीतच नाही तर संपूर्ण भारतात हवा प्रदूषण खूप भयंकर होत चाललं आहे. लांसेट स्टडीत त्याचा समावेश नाही. हवेतील गुणवत्ता मानकांना लागू करण्यात आपण अयशस्वी राहिलो. अशावेळी कमीत कमी स्वच्छ इंधनावर जोर द्यायला हवा परंतु प्रत्यक्षात प्रदूषणाबाबत दुर्लक्ष केले जात आहे. लांसेट स्टडीवरून हे स्पष्ट होते की, जागरुकता आणूनही प्रदूषणाबाबत मृत्यूमध्ये घट झाली नाही. विषारी हवा, रासायनिक प्रदूषणसारख्या विविध प्रदूषणामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. रिपोर्टनुसार १८ लाख मृत्यू विषारी रासायनिक प्रदूषणामुळे झाले आहेत.