अजित डोवाल यांचे नवं मिशन; पाकिस्तानच्या कोंडीसाठी 'फोन पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 11:46 AM2019-02-28T11:46:41+5:302019-02-28T11:49:08+5:30
पाकिस्तान नरमल्याचं दाखवत असला, चर्चेचा प्रस्ताव देत असला, तरी त्यांच्या हालचाली आणि स्वभाव पाहता ते काहीही कुरापती करू शकतात.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर केलेला एअर स्ट्राइक आणि या कारवाईनं सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ल्याचा केलेला अयशस्वी प्रयत्न, या पार्श्वभूमीवर सीमेवर आणि दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तान नरमल्याचं दाखवत असला, चर्चेचा प्रस्ताव देत असला, तरी त्यांच्या हालचाली आणि स्वभाव पाहता ते काहीही कुरापती करू शकतात. त्यामुळे, त्यांच्यावर राजनैतिक 'स्ट्राइक' करण्याचं 'मिशन' भारतानं हाती घेतलं आहे आणि त्याचं नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल करताहेत.
पाकिस्तानने आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करावेत, अशी रोखठोक भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो यांनी बुधवारी घेतली होती. त्यानंतर, रात्री उशिरा अजित डोवाल यांनी त्यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचं कळतं. अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी राहणं, हे पाकिस्तानला झेपणारं नाही. त्यामुळे हेच ब्रह्मास्त्र वापरण्याचा प्रयत्न भारत करताना दिसतोय.
मसूद अझहरला ब्लॅकलिस्ट करा, अमेरिका अन् फ्रान्सकडून प्रस्ताव https://t.co/tQD1h80rIN
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 28, 2019
भारताने दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईला अनेक मोठ्या देशांनी पाठिंबा दिला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करा, असा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत दिला आहे. त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणीही करण्यात आलीय. हे भारतासाठी मोठं यश आहे आणि पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा. वास्तविक, या बड्या देशांची सहानुभूती मिळवण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. परंतु, अमेरिकेसह रशिया, जपान, इस्रायल, ऑस्ट्रेलिया यासारखे बलाढ्य देशांनी भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे.
एक विमान पाडले म्हणून दचकायचे कारण नाही... https://t.co/ZJahJIfMJZ
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 27, 2019
माइक पॉम्पियो यांनी काल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्याशी चर्चा केली होती. लष्करी कारवाईचा विचार बाजूला ठेवून तणाव कमी करण्यास प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी पाकला केली होती. तसंच, दहशतवाद्यांच्या तळांवर कठोर कारवाई करण्यासही सांगितलं होतं. त्यांनी ही भूमिका आंतरराष्ट्रीय समूहापुढे - संयुक्त राष्ट्रांमध्येही मांडावी, ही भारताची इच्छा आहे आणि त्यादृष्टीने पावलंही पडताना दिसत आहेत.
देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं... https://t.co/zcTSDdsX2i
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 28, 2019