पाकिस्तानची पाणबुडी 5 दिवसांत मुंबईला पोहचली असती तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 10:13 AM2019-06-24T10:13:33+5:302019-06-24T10:14:57+5:30
भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो
नवी दिल्ली- पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांच्या तळांना टार्गेट केलं होतं पण त्याच दरम्यान समुद्राच्या मार्गाने पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारतीय नौदल सज्ज होतं. भारतीय नौदलाला अभ्यास सोडून पाकिस्तानच्या सागरी सीमेवर तैनात करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परमाणू आणि पारंपारिक पाणबुड्याचा समावेश करण्यात आला होता.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताचा आक्रमक पवित्रा पाहून तसेच सागरी सीमेवर नौदलाची गस्त वाढल्याने पाकिस्ताला असं वाटतं होतं की, पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी नौदलाचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे भारत पाकिस्तान सेनेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेऊन होते. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची शक्तिशाली पाणबुडी पीएनएस साद ही अचानक गायब झाली. पीएनएस साद गायब झाल्याने भारतीय नौदल तातडीनं सज्ज झालं होतं.
कारण अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार पीएनएस साद कराची जवळून गायब झालं होतं. ती पाणबुडी तीन दिवसांत गुजरातच्या तटावर आणि पाच दिवसांत मुंबईच्या पश्चिम तटावरील मुख्यालयाजवळ पोहचू शकत होतं. त्यामुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते गंभीर होतं. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी युद्ध नौका आणि विमाने तैनात करुन शोधमोहीम हाती घेतली होती.
गुजरात, महाराष्ट्रासह अनेक राज्याच्या सागरी तटांवर भारतीय नौदल आणि पी-8 विमाने टेहाळणी करत होते. नौदलाकडून स्पष्टपणे जवानांना आदेश देण्यात आला होता की, जर पीएनएस साद पाणबुडी भारतीय सागरी सीमेत प्रवेश केला तर त्याविरुद्ध योग्य ती कारवाई केली जावी. 21 दिवसांच्या या शोधमोहिमेनंतर गायब झालेली पीएनएस पाणबुडी पाकिस्तानच्या पश्चिमी तटावर आढळून आली.
बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाक आणि भारतात तणावाची परिस्थिती वाढत गेली. त्यामुळे भारतीय नौदलाने आयएनएस विक्रमादित्यसह 60 युद्ध नौका अरबी समुद्राच्या उत्तरेकडे तैनात केली होती. भारत कोणत्याही प्रकारची कारवाई करु शकतं या भीतीने पाकिस्तानने पीएनएस साद ही पाणबुडी पश्चिमेच्या तटावर लपविली होती. बालकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी नौदलाच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय नौदलाचं लक्ष्य होतं.