"हल्ल्यांनंतर हवाई दल मृतांची मोजदाद करत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 06:32 AM2019-03-05T06:32:20+5:302019-03-05T06:32:36+5:30
बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला.
कोइम्बतूर : बालाकोटमधील हवाई हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येबाबत टिप्पणी करण्यास हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी सोमवारी नकार दिला. अशा हवाई हल्ल्यांमध्ये किती जण मृत्युमुखी पडले, याची मोजदाद भारतीय हवाई दल करीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राफेल लढाऊ विमान सप्टेंबरपर्यंत भारताच्या शस्त्र भांडारात दाखल होईल, असेही धनोआ म्हणाले.
येथे एका पत्रकार परिषदेत धनोआ म्हणाले की, हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मरण पावले, याची माहिती सरकार देईल. हवाई दलाचे सैनिक केवळ योग्य ठिकाणी निशाणा लागला आहे की नाही? हेच पाहतात. ते हल्ला केल्यानंतर किती जण मरण पावले, हे पाहात थांबत नाहीत. अशा हल्ल्यांमध्ये ते शक्यही नसते. मृतांच्या संख्येबाबत त्यांनी सांगितले की, आमचे जे लक्ष्य होते, तिथे त्या वेळी किती लोक हजर होते, यावर ही संख्या ठरू शकते.
भारतीय हवाई दलाने टाकलेले बॉम्ब हे मूळ लक्ष्यापासून दूर पडले, हे खरे आहे का, असे विचारले असता, धनोआ म्हणाले की, भारतीय हवाई दलाने जर बालाकोटच्या जंगलात भलत्याच ठिकाणी बॉॅॅम्ब टाकले असते, तर पाकिस्तानला त्याचे प्रत्युत्तर देण्याची गरज नव्हती.
>दहशतवादी तळावर
सुरू होते ३०० फोन
बालाकोटमध्ये हल्ल्याच्या दिवशी ३०० फोन सुरू होते, अशी माहिती राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संस्थेकडे होती. बालाकोटमध्ये हल्ला करायची हवाई दलाला परवानगी मिळाल्यानंतर, या संस्थेने दहशतवादी तळावर तांत्रिकदृष्ट्या नजर ठेवणे सुरू केले होते. त्यात ही माहिती मिळाली होती. याचा अर्थ असाही आहे की, हल्ल्यात किमान ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
>अभिनंदन पुन्हा लढाऊ विमान उडवतील का?
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे भविष्यात पुन्हा लढाऊ विमाने उडवणार का? या प्रश्नावर बी. एस. धनोआ म्हणाले की, जर ते वैद्यकीयदृष्ट्या सक्षम वा योग्य ठरले, तरच तर ते लढाऊ विमानांचे उड्डाण पुन्हा करतील. हवाई दलामध्ये आम्ही पायलटच्या स्वास्थ्याबाबत कोणतीही तडजोड करत नाही.