विमान तिकिटाची भरपाई मिळणार, कॅन्सलेशन चार्जेसही नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:09 AM2018-05-23T00:09:28+5:302018-05-23T00:09:28+5:30
प्रवाशांच्या सोयीची बातमी; विमानप्रवासासाठी सरकार आणणार नवी नियमावली, कंपन्यांच्या चुकांमुळे सोसावा लागणारा मोठा भुर्दंड वाचणार
नवी दिल्ली : विमान कंपन्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे विमान उड्डाणाला खूपच विलंब झाला आणि त्या स्थितीत एखाद्या प्रवाशाने आपले तिकीट रद्द केल्यास त्याला संपूर्ण रक्कम परत करणे यापुढे विमान कंपन्यांवर बंधनकारक असेल. तशी तरतूद करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. नागरी विमान वाहतूक खात्याने विमान प्रवासासंदर्भात काही नव्या नियमांचा आराखडा तयार केला असून त्यावर सर्व संबंधितांची मते मागवली आहेत. येत्या दोन महिन्यांत नवे नियम लागू करण्यात येतील, असे केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी सांगितले.
दोन महिन्यांत होऊ शकते अंमलबजावणी
जयंत सिन्हा म्हणाले की, या मसुद्याबाबत सर्व संबंधितांचे म्हणणे समजून घेतले जाईल. त्यानंतर आवश्यतेनुसार बदल करून हे नियम लागू केले जातील. साधारणपणे दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करून नवीन नियमावली लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.
असे असतील नवीन नियम
विमानाचं तिकीट काढल्यापासून २४ तासांच्या रद्द केल्यास तिकिटाच्या रकमेतून त्यासाठी शुल्क (कॅन्सलेशन चार्ज) कापले जाणार नाही. या काळात प्रवासी तिकिटामध्ये अन्य काही बदल करू इच्छित असेल, तर तोही मोफत करून देणे विमान कंपनीवर बंधनकारक असेल. प्रवास सुरू करायच्या चार दिवस आधी म्हणजे ९६ तास आधी तिकीट रद्द केले तरीही प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागणार नाही, अशा तरतुदी या आराखड्यात आहेत.
कंपन्यांच्या मनमानीला बसेल चाप
मूळ भाडे (बेसिक फेअर) व इंधनाचा दर (फ्युएल चार्जेस) मिळून जी रक्कम होईल, त्याहून कॅन्सलेशन चार्ज अधिक असू नये, अशीही तरतुद त्यात आहे. एका अर्थी या नियमांमुळे विमान कंपन्यांच्या मनमानीला चाप बसू शकेल. हे नियम लागू झाल्यानंतर विमान कंपनीच्या चुकीमुळे विमानाला विलंब झाल्यास, कंपनीने प्रवाशांना नुकसानभरपाई देणे गरजेचे ठरेल.
विमान रखडल्यास प्रवाशांच्या राहायची व्यवस्थाही करावी लागेल
विमान उड्डाण दुसऱ्या दिवसापर्यंत सुटले नाही वा रखडले, तर प्रवाशांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी विमान कंपन्यांची असेल. त्यासाठी प्रवाशांकडून कोणतीही रक्कम आकारता येणार नाही.
कनेक्टिंग फ्लाइट चुकल्यास कंपन्या जबाबदार
एखाद्या विमानाच्या विलंबामुळे प्रवाशाचे 'कनेक्टिंग फ्लाइट' चुकले तर कंपनीने प्रवाशांना ठराविक रक्कम देणे बंधनकारक असेल. विमानास खूपच बिवलंब होत असल्याने प्रवाशाने तिकीट रद्द केल्यास तिकिटाची पूर्ण रक्कम कंपनीने प्रवाशास द्यावीच लागेल.
दिव्यांगांना नीट बसता यावे यासाठी विमानात उत्तम सोय करावी लागेल
दिव्यांग प्रवाशांना विमानात नीट बसता यावे, यासाठी जादा लेग स्पेस (समोर अधिक जागा असलेली आसने) असलेल्या सीट्स उपलब्ध करून देणे ही विमान कंपन्यांची जबाबदारी असून, त्यासाठी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे जादा आकारणी करता येणार नाही. तसेच पेपरलेस प्रवासासाठी सर्व प्रवाशांना विशिष्ट क्रमांक (युनिक नंबर) देण्याच्या प्रस्तावाचाही आराखड्यात उल्लेख आहे.