विमान प्रवास @ २५००
By admin | Published: June 16, 2016 04:28 AM2016-06-16T04:28:29+5:302016-06-16T04:28:29+5:30
बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल.
नवी दिल्ली : बहुप्रतीक्षित राष्ट्रीय नागरी विमान वाहतूक धोरणाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, त्यामुळे यापुढे एक तासाच्या उड्डाणासाठी प्रवाशांना २,५00 रुपये भाडेच द्यावे लागेल. प्रादेशिक विमान उड्डाणासाठीचे शुल्क यापुढे किमान असेल आणि हेलिकॉप्टरच्या संचालनासाठीही सरकार नवे नियम तयार करणार आहे. तसेच विमान कंपन्यांना सध्या असलेल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठीच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
या धोरणामुळे २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे विमान वाहतूक केंद्र होईल, असा विश्वास नागरी विमानमंत्री अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केला आहे. विमान वाहतूक क्षेत्रात जी वाढ होत आहे, त्याचा लाभ घेण्यावरही जोर देण्यात आला आहे. याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू म्हणाले की, हे धोरण नवी दिशा देणारे ठरेल. तब्बल आठ महिने या धोरणावर विचारविनिमय करण्यात आला आहे. मंत्रालयाने आॅक्टोबर २०१५ मध्ये याबाबतचा संशोधित मसुदा जाहीर केला होता. याबाबत टिष्ट्वट करताना राजू यांनी म्हटले आहे की, आमूलाग्र बदलासाठी हे धोरण निर्णायक ठरेल. सन २०२२ पर्यंत भारत जगातील तिसरे सर्वात मोठे नागरी विमान वाहतुकीचे केंद्र असेल. त्यासाठी आम्हाला योजनांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विमान वाहतूक धोरणाची वैशिष्ट्ये ...
- भारतीय एअरलाइन्सच्या विदेशात उड्डाणासाठी किमान ५ वर्षांचा आणि
20 विमानांचा नियम.
- प्रादेशिक विमान उड्डाणाला कमी शुल्क.
- विमान कंपन्यांना मालाच्या चढ-उतारासाठी मंजुरी.
- हेलिकॉप्टरच्या संचालनासाठी सरकार नवे नियम.
- प्रादेशिक विमान सेवा वाढविण्यासाठी एक तासाच्या उड्डाणाकरिता विमानभाडे २५०० रुपये निश्चित.
धोरणाचे स्वागत : विमान वाहतूक धोरणाचे स्वागत. या धोरणात एक तासाच्या प्रादेशिक प्रवास भाड्यावर २५00 रुपयांचे बंधन घातल्याने अनेक नवीन शहरे हवाईमार्गे जोडली जातील. सध्याच्या प्रवासासाठीही ही सवलत असेल, हा गैरसमज आहे. विमान कंपन्यांना आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी असलेल्या अटी रद्द करणे हे आतापर्यंतच्या धोरणाला अनुसरून आणि या क्षेत्राच्या वृद्धीसाठी आवश्यकच आहे. मात्र या वाढीसाठी लागणारी हवाई आणि विमानतळांवरील वाहतुकीच्या नियमनाची तयारी केली आहे का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हे क्षेत्र २00४ साली सर्वांसाठी खुले केल्याचे चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाची विमानतळे आणि विमान कंपन्या ही त्याचीच उदाहरणे आहेत. - प्रफुल्ल पटेल, माजी विमान वाहतूकमंत्री