उन्हाळ्यात हवाई प्रवास भाड्यात ९ टक्के घसरण; मागणी वाढूनही स्वस्ताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:58 AM2018-04-15T00:58:40+5:302018-04-15T00:58:40+5:30
विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
चेन्नई : विमान प्रवासाचा विचार मनात असेल, तर पटकन निर्णय घ्या. यंदा उन्हाळ्यात देशांतर्गत विमान प्रवास ४ ते ९ टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. ट्रॅव्हल अॅग्रीगेटर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, हवाई तिकिटांच्या मागणीत २0 टक्के वाढ झाली असतानाही भाड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत घसरण झाली आहे.
हवाई प्रवास भाड्यात गेल्या वर्षीच्या या काळाच्या तुलनेत ५ टक्के घसरण झाली आहे. केवळ दिल्ली-मुंबई क्षेत्रातील हवाई प्रवास भाडे १२ टक्क्यांनी वाढले आहे. एप्रिल ते जून या काळात हवाई प्रवास भाडे ९ टक्क्यांनी कमी झाले आहे. आंतरराष्टÑीय हवाई प्रवास भाड्यातही सरासरी १९ टक्के घसरण झाली आहे.
यात्रा डॉट कॉमचे सीओओ शरद धल्ल यांनी सांगितले की, विमान कंपन्यांची अतिरिक्त क्षमता आणि कमालीची स्पर्धा यामुळे हवाई भाड्याचे दर घसरले आहेत. याशिवाय सध्या तेलाच्या किमतीही स्थिर असल्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात बचत झाली आहे.
धल्ल यांनी सांगितले की, मुंबई व दिल्ली या हवाई वाहतुकीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. विमानतळांवरील धावपट्ट्या बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक महागली आहे.
स्पर्धेमुळे सवलती
स्पर्धेमुळे विमान कंपन्यांनी सवलतीच्या अनेक योजना जाहीर केल्या आहेत. स्पाइस जेट, गोएअर आणि एअरएशिया या कंपन्यांनी १,६00 रुपयांच्या आत विमान प्रवासाच्या योजना आणल्या आहेत. नागपूर, चेन्नई, गुवाहाटी, इम्फाळ, पुणे, भुवनेश्वर ही गंतव्य स्थाने यंदाच्या हंगामात लोकप्रिय आहेत.