एअरसेल-मॅक्सिस प्रकरणी पी. चिदम्बरम यांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 12:25 AM2018-06-06T00:25:40+5:302018-06-06T00:25:40+5:30
माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून, १० जुलैपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली : माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम यांना एअरसेल-मॅक्सिस मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या स्थानिक न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून, १० जुलैपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, चिदम्बरम मंगळवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. ईडीने त्यांची अनेक तास चौकशी केली.
चिदम्बरम यांच्या जामीन अर्जाला उत्तर देण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चार आठवड्यांची मुदत मागितली आहे. या प्रकरणी चिदम्बरम यांनी पहिल्यांदाच ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. सकाळी १०.५८ वा. ते आपल्या एका वकिलासोबत ईडीच्या मुख्यालयात आले. दोन तास चौकशी केल्यानंतर त्यांना १.३० वा. जेवणासाठी जाऊ देण्यात आले. दुपारी ३ नंतर पुन्हा काही काळ चौकशी करण्यात आली.
ईडीने काल त्यांना समन्स बजावून चौकशीसाठी हजर होण्यास सांगितले होते. ३,५०० कोटींच्या एअरसेल-मॅक्सिस व्यवहारात चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती यांची ईडीने चौकशी केली आहे.
अटक टाळण्यासाठी याचिका
चिदम्बरम यांनी अटकेपासून संरक्षणासाठी गेल्या आठवड्यात विशेष न्यायाधीश ओ. पी. सैनी यांच्यासमोर याचिका दाखल केली होती. याच न्यायालयाने त्यांना दिलासा देताना १० जुलैपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले आहेत. ईडीने याआधी चिदम्बरम यांना ३० मे रोजी हजर होण्याचे आदेश दिले होते. चिदम्बरम यांनी त्याच दिवशी न्यायालयात याचिका दाखल केली होती.