एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 12:37 PM2018-02-21T12:37:51+5:302018-02-21T12:38:03+5:30

आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

Aircel warns staff to brace for difficult times ahead | एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

एअरसेलच्या 5000 कर्मचाऱ्यांना निरोपाचा नारळ?

Next

नवी दिल्ली: भारतातील सर्वात लहान आकाराची टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या एअरसेलला घरघर लागली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीकडून लवकरच 5000 कर्मचाऱ्यांची कपात केली जाण्याची शक्यता आहे. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असे सांगत कंपनीने कर्मचाऱ्यांना या सगळ्याची आधीच कल्पना दिली आहे. गेल्या काही काळापासून टेलिकॉम क्षेत्रात निर्माण झालेल्या तीव्र स्पर्धेमुळे एअरसेलवर ही वेळ ओढावल्याचे बोलले जाते.

याविषयी बोलताना एअरसेलचे सीईओ कैझाद हिरजी यांनी सांगितले की, आमच्याकडे बऱ्याच काळापासून निधीची चणचण आहे. त्यामुळे कंपनीचे व्यवहार चालवण्यासाठी आम्ही दैनंदिन व्यवसायातून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरच अवलंबून आहोत. गेल्या काही काळापासून या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाल्यामुळे बाजारावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. आम्हालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आगामी काळात ही परिस्थिती आणखी बिघडू शकते. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळातही मोठे बदल झाले आहेत. या नव्या संचालकांकडून कंपनीला वाचवण्यासाठी नवी धोरणे निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एअरसेलने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीचा अर्ज दाखल केला होता. तेव्हापासून एअरसेल इतिहासजमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आर्थिक चणचणीमुळेच आमचे नेटवर्क आणि प्रणाली कालबाह्य ठरू लागल्याचेही कैझाद हिरजी यांनी सांगितले. 

रिलायन्स जिओने बाजारपेठेत प्रवेश करण्यापूर्वी जुलै 2016 या तिमाहीत एअरसेलचा चालू नफा 120 कोटी इतका होता. जुलै 2017 च्या तिमाहीपर्यंत तो 5 कोटींपर्यंत खाली घसरला. त्यानंतरच्या तिमाहीत तर कंपनीला 120 कोटींचा तोटा झाला. या आर्थिक चणचणीमुळे एअरसेलकडून अनेक देणी थकली आहेत. त्यामुळे टॉवर्स व्हेंडर्सनी एअरसेलच्या अनेक सेंटर्सना सेवा पुरवणे बंद केले आहे. याशिवाय, एअरसेलने घेतलेले कर्ज बुडीत खात्यांमध्ये जमा झाल्यामुळे अनेक बँकांकडून कंपनीची खाती गोठवण्यात आली आहेत. या कर्जांचे हप्ते पुन्हा बांधून द्यायलाही बँकानी नकार दिला आहे. परिणामी सध्याच्या घडीला एअरसेलच्या डोक्यावर 15,500 कोटीच्या कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळेच कंपनीकडून ही कर्मचारी कपात होणार आहे.

Web Title: Aircel warns staff to brace for difficult times ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल