विमानवाहू ‘विक्रांत’ची बांधणी पूर्णतेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 05:40 AM2019-07-09T05:40:30+5:302019-07-09T05:40:35+5:30

स्वदेशी; सप्टेंबर २०२१ मध्ये नौदलाकडे सुपूर्द

The aircraft carrier 'Vikrant' is completely built | विमानवाहू ‘विक्रांत’ची बांधणी पूर्णतेकडे

विमानवाहू ‘विक्रांत’ची बांधणी पूर्णतेकडे

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ‘विक्रांत’ या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या बाधणीचे काम ठरल्या वेळापत्रकानुसार सुरू होत असून, ही युद्धनौका सप्टेंबर २०२१ मध्ये चाचण्यांसाठी भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल, असे युद्धनौका उत्पादन व संपादन विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल ए. के. सक्सेना यांनी सोमवारी सांगितले.
नौदल आणि फिक्कीने ‘जहाजबांधणीच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ यावरील परिसंवादाची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अ‍ॅडमिरल सक्सेना बोलत होते. ते म्हणाले की, ‘विक्रांत’ विमानवाहू युद्धनौकेची जनित्रे या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कार्यान्वित केली जातील. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये तिच्या मूलभूत चाचण्या घेण्यात येतील. त्यानंतर प्रायोगिक सागर सफरी पूर्ण करून प्रगत चाचण्यांसाठी ही युद्धनौका सप्टेंबर २०२१ मध्ये नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. आणखी एका नौदल अधिकाºयाने सांगितले की, नौदलाच्या चाचण्या फेब्रुवारी २०२१ पासून सुमारे दोन वर्षे चालतील व त्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका सन २०२३ च्या सुरुवातीस नौदलाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

कशी असेल युद्धनौका?
पूर्वी भारतीय नौदलात ‘विक्रांत’ नावाची परदेशातून जुनी घेतलेली पहिली विमानवाहू युद्धनौका होती. निवृत्तीनंतर ती भंगारात गेल्यानंतर त्याच नावाची स्वदेशी युद्धनौका बांधली जात आहे.
वजन ४० हजार टन असेल.
हे बांधणीचे काम कोचीन जहाजबांधणी आवारात सुरू आहे.
नौदलात सध्या कार्यरत असलेल्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेप्रमाणे या नव्या युद्धनौकेवरही ‘शॉर्ट टेकआॅफ बट अ‍ॅरेस्टेड रिकव्हरी’ (स्टोबार) पद्धतीची विमानोड्डाण व्यवस्था असेल.
तुलनेने कमी लांबीची धाव घेऊन शेवटी शेवटी जराशा उंच धावपट्टीवरून उडी घेत (स्की जंप) लढाऊ विमाने या युद्धनौकेवरून उड्डाण करू शकतील. उतरण्यासाठीही त्यांना कमी धावपट्टी लागेल.
‘विक्रांत’वर रशियन बनावटीची ‘मिग २९ के’ लढाऊ विमाने असतील. ‘विक्रमादित्य’वरही तीच विमाने आहेत.

Web Title: The aircraft carrier 'Vikrant' is completely built

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.