पाकिस्तानमार्गे उड्डाण करण्यास विमान कंपन्यांचा नकार
By admin | Published: August 23, 2016 09:50 AM2016-08-23T09:50:57+5:302016-08-23T09:50:57+5:30
भारतीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानमार्गे उड्डाण करण्यास नकार दिला असून केंद्र सरकारला आखाती देशांच्या उड्डाण मार्गात बदल करण्याची मागणी केली आहे
Next
>- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - भारतीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानमार्गे उड्डाण करण्यास नकार दिला आहे. कंपन्यांनी केंद्र सरकारला आखाती देशांच्या उड्डाण मार्गात बदल करण्याची मागणी केली आहे. आम्हाला पश्चिम भारत (मुख्यत: अहमदाबाद) मार्गे उड्डाण करण्याची परवानगी देण्यात यावी जेणेकरुन अरबी समुद्रावरुन आखाती देशांकडे प्रवास करता येईल, आणि पर्यायाने पाकिस्तान मार्गाचा वापर करावा लागणार नाही असं कंपन्यांनी सांगितलं आहे. पाकिस्तानमार्गे जाताना खूप फिरुन जावं लागत असल्याचं एअरलाइन्सचं म्हणणं आहे.
सोबतच भारत - पाकिस्तानच्या बिघडणा-या संबंधावरुनही कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. एअर इंडिया, जेट एअरवेज, इंडिगो आणि स्पाईसजेटसारख्या विमान कंपन्या पाकिस्तानमार्गे आखाती देशांमध्ये प्रवास करतात. गेल्या काही दिवसात भारताने पाकिस्तानच्या अनिर्धारित विमानांना परत जाण्यास सांगितलं होतं, त्यामुळे पाकिस्तानही बदला घेण्यासाठी अशीच कारवाई करु शकतं. विमान कंपन्या यामुळेच मार्ग बदलण्याची मागणी करत आहेत तसंच यासोबत आर्थिक कारणंदेखील आहेत अशी माहिती एका एअरलाइन्स कंपनीच्या अधिका-याने दिली आहे.
स्पाइसजेटने आपल्या विमानांना अहमदाबादवरुन सरळ आखाती देशांमध्ये उड्डाण करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. एअरफोर्स आणि नौदलाकडून वापरण्यात येणा-या मार्गाचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी असं कंपनीचं म्हणणं आहे.