औरंगाबादहून लवकरच देशातील महानगरांमध्ये विमानसेवा; केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 09:34 AM2022-02-16T09:34:23+5:302022-02-16T09:36:20+5:30
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा
नवी दिल्ली : औरंगाबाद येथील देशातील प्रमुख महानगरांमध्ये जाण्यासाठी लवकरच हवाई मार्गाने जोडले जाणार असून यामुळे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला नवी संजीवनी मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.
लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची भेट घेतली. यावेळी डॉ. कराड यांनी औरंगाबाद व मराठवाडा विभागाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या औरंगाबाद येथून विमानसेवा योग्यरीतीने नसल्याने विकासाला चालना मिळत नाही, तसेच लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी निदर्शनास आणून दिले. याबद्दल बोलताना डॉ. कराड म्हणाले, औरंगाबाद येथून देशातील इतर महानगरांमध्ये जाण्यासाठी अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करीत आता दोन विमान कंपन्यांनी औरंगाबाद येथून महानगरांमध्ये विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडची फ्लाय बिग व प्रसिद्ध उद्योजक राकेश झुनझुनवाला यांची आकासा एअर कंपन्यांनी औरंगाबादहून महानगरांमध्ये विमानसेवा देण्याची हमी दिली आहे. यामुळे औरंगाबादहून आता मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलुरू, कोल्हापूर, नांदेड या शहरांमध्ये थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे.
औरंगाबाद येथेच बेस राहील
औरंगाबाद येथे बेस तयार करून या महानगरांमध्ये विमानांची ये-जा केली जाणार आहे. यासाठी मुंबई व पुणे हे गर्दीचे विमानतळ आहे. या विमानतळांवर विमानांना उतरण्यासाठी वेळ देण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. शिर्डी येथे दररोज १२ पेक्षा अधिक विमाने उतरतात.
औरंगाबादला बुद्धिस्ट हेरिटेजशी जोडावे - सुनीत कोठारी
बोधगया, सारनाथ, बनारस, कुशीनगर येथे येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद येथे येण्यासाठी बुद्धिस्ट हेरिटेजशी औरंगाबादला जोडण्याची आवश्यकता आहे. यामुळे विदेशातील पर्यटकसुद्धा औरंगाबाद येथे येतील, अशी सूचना सिव्हिल एव्हिएशन कमिटी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी केली. ते म्हणाले, बौद्ध धर्माचे लोक असलेले अनेक पर्यटक येतात. या साखळीत औरंगाबादला जोडले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली.
राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचा उल्लेख
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या विकासाला चालना दिली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद विमानतळाचा विस्तार झाल्याचा डॉ. भागवत कराड यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. या विमानतळाच्या विकासाला सध्या आळा बसला आहे. या नव्या योजनांमुळे राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या या दूरदृष्टीच्या विकासाला चांगले फळ येईल, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.
बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांची औरंगाबाद येथे बैठक
केंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा लोकांना व्हावा व बँकिंग क्षेत्राचा लाभ आदिवासी व ग्रामीण भागापर्यंत नेण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येत आहे, यावर चर्चा करण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला औरंगाबाद येथे सार्वजनिक उपक्रम व खासगी क्षेत्रातील बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक आयोजित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे अर्थसचिव, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, नाबार्ड, सिडकोचे अधिकारी व सार्वजनिक उपक्रमातील १२ बँकांचे व खासगी क्षेत्रातील २२ बँकांचे मुख्य महाव्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.