‘इसिस’वर हवाईहल्ले

By admin | Published: September 13, 2014 12:02 AM2014-09-13T00:02:01+5:302014-09-13T00:02:01+5:30

इसिसवर हल्ले चढविण्याचा अमेरिकेने आपल्या ४० मित्र देशांसह घेतलेला निर्णय जगातल्या त्या सर्वाधिक हिंसाचारी व कडव्या संघटनेचे कंबरडे मोडणारा

The airplanes on 'Isis' | ‘इसिस’वर हवाईहल्ले

‘इसिस’वर हवाईहल्ले

Next

इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅन्ड सिरिया (इसिस) वर हल्ले चढविण्याचा अमेरिकेने आपल्या ४० मित्र देशांसह घेतलेला निर्णय जगातल्या त्या सर्वाधिक हिंसाचारी व कडव्या संघटनेचे कंबरडे मोडणारा व तिला कायमचे नेस्तनाबूत करू शकणारा आहे. शिवाय जगभरच्या सगळ्या धर्मांधांना जगातल्या एवढ्या सगळ्या देशांनी मिळून दिलेला तो गंभीर इशाराही आहे. पूर्वेला इराकच्या बगदाद या राजधानीपासून पश्चिमेला सिरियातील अक्का या मोठ्या शहरापर्यंत आपल्या हुकूमतीचे जाळे पसरविणाऱ्या या दहशतखोर संघटनेने त्या दोन्ही देशांतील सरकारांना पडद्याआड जायला भाग पाडले आहे. त्याच वेळी या संघटनेने आपल्या विरोधकांवर, शियापंथी मुसलमानांवर, विदेशी पत्रकारांवर आणि स्त्रियांवर जे अनन्वित अत्याचार केले ते अंगावर शहारे आणणारे आहेत. आम्ही स्थापन केलेल्या खिलाफतीचा आदेश न ऐकणाऱ्या सुन्नींसह सारे शियापंथी मृत्युदंडाला पात्र आहेत अशी या इसिसची घोषणा आहे. अमेरिकेच्या दोन पत्रकारांची मुंडकी धडावेगळी करून त्या प्रकाराची चित्रफीत जगाला दाखविण्याचा वेडगळपणा करणाऱ्या या संघटनेने आपल्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील १४ ते ४६ या वयोगटातील ४० लाख स्त्रियांवर खातना लादण्याची अमानुष घोषणाही केली आहे. तालिबान आणि अल् कायदा या दोन्ही कट्टरपंथी संघटनांना कडवेपणा व हिंस्रपणा या दोहोत मागे टाकणाऱ्या या संघटनेने जगभरातील मुसलमान तरुणांना आपल्यासोबत येण्याचे आवाहन केले असून, अमेरिकेला तिच्या रक्तातच बुडवून ठार मारण्याची भाषा वापरली आहे. एकट्या सिरियात या संघटनेने व तिच्यामुळे घडलेल्या हिंसाचाराने १ लाख ९१ हजारांवर लोक आतापर्यंत मृत्युमुखी पडले आहेत. आश्चर्याची बाब ही, की तिला येऊन मिळणाऱ्या व डोक्यात जिहाद घेतलेल्या तरुणांची संख्या त्यानंतर वाढली आहे. मोसूल हे इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर तिने आता ताब्यात घेतले आहे. शिवाय तिचे शस्त्रबळ अत्याधुनिक व कमालीचे संहारक आहे. या संघटनेपासून एकट्या अमेरिकेला वा पाश्चात्त्य जगालाच धोका आहे, असे समजण्याचे कारण नाही. आपल्या शाखा पाकिस्तान, भारत, बांगलादेश व म्यानमारमध्ये उघडण्याचा इरादा तिने जाहीर केला आहे. शिवाय आफ्रिका खंडातही एका वेगळ्या खिलाफतीची स्थापना करण्याचे प्रयत्न तिने चालविले आहेत. इसिसच्या धोक्याची पहिली कल्पना जगाला इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दिली. तीन महिन्यांपूर्वीच इंग्लंडचे सैन्य इसिसवर हल्ला करील असे त्यांनी पार्लमेंटमध्ये जाहीर केले होते. त्यांच्या त्या घोषणेला पार्लमेंटने हर्षभराने साथही दिली होती. इंग्लंड ही आता जगातली फार मोठी सत्ता उरली नसल्याने कॅमेरून यांचा इशारा इसिसच्या पुढाऱ्यांनी फारशा गंभीरपणे घेतला नाही. कॅमेरूनपाठोपाठ फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कॉ होलेंड यांनीही इसिसला अशाच कारवाईचा इशारा दिला. त्यानंतरही अमेरिकेच्या दोन पत्रकारांना पकडून व त्यांचे गळे कापून आपल्या पराक्रमाची जाहिरात इसिसच्या पुढाऱ्यांनी केली. त्याच वेळी अमेरिकेवर हल्ले चढविण्याची धमकीही दिली. एवढे सारे झाल्यानंतर अमेरिका गप्प राहण्याची शक्यता अर्थातच कमी होती. दीर्घकाळ योजना आखून व कमालीच्या गुप्तपणे कारवाई करून अमेरिकेच्या लष्कराने पाकिस्तानातील आबोटाबादमध्ये दडून बसलेल्या ओसामा बिन लादेनचा खातमा केल्याची घटना ताजी आहे. असा देश इसिसच्या कारवाया मुकाट्याने सहन करील आणि तिने दिलेल्या धमक्या नुसत्याच ऐकून घेईल याची शक्यता कमी होती. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी इसिसवर हवाईहल्ले करण्याचा आपला इरादा आता जाहीर केला आहे. आमच्या देशाला धमकी देणारे दहशतवादी जगाच्या पाठीवर कुठेही असतील तरी आम्ही त्यांचा पाठलाग करू असे सांगून सिरिया आणि इराकमध्ये इसिसविरुद्ध कारवाई करायला आम्ही जराही मागेपुढे पाहणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी इसिसवरचे हवाईहल्ले आता सुरूही केले आहेत. या कारवाईत तीन डझनांहून अधिक पाश्चात्त्य देश अमेरिकेसोबत आहेत. एका दहशतखोर संघटनेविरुद्ध उभे राहिलेले हे जागतिक संघटन आहे. दहशतवाद हा कोणत्याही एका देशाला असलेला धोका नसून ते साऱ्या जगावरचे संकट आहे ही बाब आता साऱ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे आणि तिच्याविरुद्ध जगानेच संघटित झाले पाहिजे. संयुक्त राष्ट्र संघटनेनेही अशा कारवायांचे आता नेतृत्व करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: The airplanes on 'Isis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.