ग्वाल्हेरमधील विमानतळाचे झाले युद्ध थिएटरमध्ये रूपांतर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 04:08 AM2019-06-25T04:08:08+5:302019-06-25T04:09:04+5:30
कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले.
ग्वाल्हेर : कारगिल युद्धाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय हवाई दलाने सोमवारी ग्वाल्हेर विमानतळाला युद्ध थिएटरमध्ये रूपांतरित केले. १९९९ मध्ये झालेल्या काही महत्त्वपूर्ण घटनांचे नाट्य रूपांतर यात सादर करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या द्रास-कारगिल भागातील टायगर हिल हल्ल्याचे प्रतीकात्मक रूपांतरण करण्यात आले आहे. युद्धातील महत्त्वपूर्ण घटना पुन्हा उभ्या करण्यासाठी हवाई दलाने मिराज २००० विमान आणि स्फोटकांचा वापर केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी एअर चीफ मार्शल बीएस धनोआ होते.
भारतीय हवाई दलाने युद्धाची २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले आहे. विमानतळावरील प्रदर्शनात पाच मिराज २०००, दोन मिग २१ आणि एक सुखोई ३० एमकेआय तैनात करण्यात आले आहे. २००० मिराजपैकी एकात बॉम्बवाहक दाखविण्यात आले आहे. या बॉम्बचा उपयोग फेब्रुवारीत बालाकोटमध्ये हवाई हल्ल्यात करण्यात आला होता.
हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कारगिल युद्ध म्हणजे उंच पहाडी भागात हवाई दलाच्या शक्तीचा एक अनुभव होता. आॅपरेशन विजयमध्ये सहभागी असलेले वीरता पुरस्कार प्राप्त करणारे सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. (वृत्तसंस्था)
एएन-३२ विमानांचा वापर तूर्त अपरिहार्य
ग्वाल्हेर : जुन्या झालेल्या व वारंवार अपघात होणाºया अवजड मालवाहू एएन-३२ विमानांना पर्याय म्हणून नवी विमाने घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जोपर्यंत नवी विमाने येत नाहीत तोपर्यंत एएन-३२ विमानांचा वापर सुरू ठेवण्याखेरीज आमच्यापुढे अन्य पर्याय नाही, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. ए. धनोआ यांनी सोमवारी येथे सांगितले. कारगिल युद्धाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त येथील हवाई तळावर आयोजित कार्यक्रमात धनोआ बोलत होते. ते म्हणाले की, उंच पहाडी प्रदेशात लष्करी साहित्य पोहोचविण्यासाठी हवाई दलाला सध्या तरी एएन-३२ विमानेच वापरणे भाग आहे. पर्याय म्हणून घेण्यात येत असलेली विमाने दाखल झाली की ती या कामासाठी वापरून एएन-३२ प्रशिक्षणासाठी वापरली जातील.
हवाई दलातील मिराज लढाऊ विमानांचा ग्वाल्हेर हा मुख्य तळ आहे. याच मिराज विमानांनी ‘टायगर हिल’वर अचूक मारा केल्याने कारगिल युद्धास निर्णायक कलाटणी मिळाली, याचे हवाई दलाच्या प्रमुखांनी गौरवाने स्मरण दिले. बालाकोट ‘एअर स्ट्राईक’साठीही मिराज विमानेच वापरली गेली होती आणि मिराज विमाने हाच आजही हवाई दलाचा मुख्य मारक ताफा आहे, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)