३७० रद्द करणे ऐतिहासिक पाऊल -मनोज नरवणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 03:46 AM2020-01-16T03:46:06+5:302020-01-16T03:46:29+5:30
लष्कर स्थापनेचा ७२ वा दिन; छुपे युद्ध लढणाऱ्याचे कट उधळले गेले
नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेले घटनेतील ३७० अनुच्छेद रद्द करणे हे ‘ऐतिहासिक पाऊल’ होते, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी त्याची प्रशंसा केली.
ते म्हणाले, ‘अनुच्छेद रद्द झाल्यामुळे पश्चिमेकडील देशाच्या आणि त्याच्यासाठी छुपे युद्ध लढणाºयाचे कट उधळले गेले.’ दहशतवादी कृत्ये सशस्त्रदले अजिबात सहन करणार नाहीत, असे नरवणे लष्कर स्थापनेच्या ७२ व्या दिन कार्यक्रमात येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर बोलताना म्हणाले. ‘जे दहशतवादाला चिथावणी देत आहेत त्यांना चोख उत्तर देण्याचे अनेक पर्याय आमच्याकडे असून, ते वापरण्यास मागे-पुढे पाहिले जाणार नाही’, असे ते म्हणाले.
नरवणे म्हणाले, ‘अनुच्छेद ३७० रद्द करणे हे ऐतिहासिक पाऊल आहे. जम्मू आणि काश्मीरला राष्ट्रीय मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल. त्या पावलामुळे आमच्या पश्चिमेकडील शेजाºयाचे व त्याच्यासाठी छुप्यारीतीने युद्ध लढणाऱ्यांची कटकारस्थाने उधळली गेली आहेत.’
प्रथमच पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व महिलेकडे
भारतीय लष्कर दिनानिमित्त बुधवारी लष्करातील काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे दर्शन जगाला घडवण्यात आले. बुधवारच्या संचलनाचे वैशिष्ट्य असे होते की, कॅप्टन तानिया शेरगिल यांनी पुरुषांच्या तुकडीचे नेतृत्व केले. अशा प्रकारचे नेतृत्व करणाºया त्या पहिला महिला ठरल्या आहेत. प्रत्येक १५ जानेवारीला लष्कर दिन साजरा केला जातो. १९४९ मध्ये याच दिवशी ब्रिटिशांचे शेवटचे कमांडर इन चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून पदभार घेऊन लेफ्टनंट जनरल के.एम. करियप्पा भारतीय लष्कराचे कमांडर इन चीफ झाले होते. बुधवारी लष्कराचा ७२ वा लष्कर दिन होता व प्रथमच यात संरक्षणप्रमुख सहभाग नोंदवत होते.