अय्यर म्हणाले होते मोदींना मार्गातून हटवा, पण माझा गुन्हा काय ? - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 03:49 PM2017-12-08T15:49:30+5:302017-12-08T15:51:55+5:30
काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीच असा उल्लेख करुन भाजपाच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
अहमदाबाद - काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नीच असा उल्लेख करुन भाजपाच्या हाती आयते कोलीत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गुजरात निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी याच नीच शब्दावरुन सहानुभूतीचे राजकारण सुरु आहे. 2015 साली मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या पाकिस्तान दौ-यात नरेंद्र मोदींना मार्गातून हटवा असे विधान केले होते. अय्यर यांच्या त्याच विधानाचा धागा पकडून मोदींनी शुक्रवारी जाहीर सभेमध्ये काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
मोदींना मार्गातून हटल्यानंतरच भारत-पाकिस्तानमध्ये शांतीसंबंध सुधारु शकतात असे अय्यर त्यांच्या पाकिस्तान दौ-यात म्हणाले होते. मला मार्गातून हटवायचे म्हणजे नेमके काय? अय्यर यांना नेमके काय म्हणायचे होते? माझा गुन्हा काय? आम्हाला लोकांचा आशिर्वाद आहे असे मोदी म्हणाले. पाकिस्तानातील एका टॉक शो मध्ये बोलताना अय्यर यांनी हे विधान केले होते.
भारत-पाकिस्तान संबंधात निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी काय करावे लागेल असा प्रश्न पाकिस्तानी वाहिनीच्या अँकरने विचारला होता. त्यावर अय्यर यांनी सर्वात प्रथम मोदींना हटवले पाहिजे त्यानंतरच चर्चा पुढे जाऊ शकते असे उत्तर दिले होते. आपल्याला अजून चारवर्ष थांबावे लागेल. मोदी असताना भारत-पाकिस्तानसंबंध सुरळीत होतील असे आपल्याला वाटत नाही असे अय्यर म्हणाले होते. अय्यर यांनी भारतात परतल्यानंतर असे कुठलेही विधान केल्याचे नाकारले होते. गुजरात निवडणुकीच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना अय्यर यांनी केलेल्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.
शिक्षा भोगायला तयार
मी केलेल्या वक्तव्याचा गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाला फटका बसला तर पक्ष देईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे असे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे.
आधीही काँग्रेसला बसला आहे वादग्रस्त वक्तव्याचा फटका
2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी एका प्रचारसभेत वक्तव्य केलं होतं की, सर्जिंकल स्ट्राइक आपल्या जवानांनी केला होता. त्यांच्या रक्तामागे तुम्ही (नरेंद्र मोदी) आहात. तुम्ही त्यांची दलाली करत आहात. दुसरीकडे, 2014 मध्ये सोनिया गांधींनी कर्नाटकमधील प्रचारसभेत नरेंद्र मोदींवर 'विषाची शेती' करण्याचा आरोप केला होता. 2007 मध्येही सोनिया गांधींनी असं एक वक्तव्य केलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मोदींना 'मौत का सौदागर' असं म्हटलं होतं. यामुळे मुस्लमांची मतं आपल्याला मिळतील असा काँग्रेसला विश्वास होता. मात्र ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाला मिळाला होता.