भाजपाशी केली युती अन् वडिलांना मिळाली संचित रजा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 04:22 PM2019-10-26T16:22:36+5:302019-10-26T16:39:03+5:30
जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून आले आहेत.
चंदीगड/नवी दिल्ली : हरयाणामधील जननायक जनता पार्टीचे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला यांना दोन आठवड्यांसाठी जेलमधून संचित रजा (फर्लो) मिळाली आहे. अजय चौटाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी जेलमधून बाहेर येणार आहेत. सध्या ते दिल्लीतील तिहार जेलमध्ये आहेत.
हरयाणा विधानसभा निवडणुकीचा 24 ऑक्टोबरला लागलेला निकाल पाहता दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत जननायक जनता पार्टीचे 10 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या जननायक जनता पार्टीला सोबत घेत भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिक्षक भरती घोटाळ्यात अजय चौटाला दोषी
हरयाणामधील ज्युनिअर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी अजय चौटाला यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. हरायाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलाचे (आयएनएलडी) अध्यक्ष ओमप्रकाश चौटाला आणि अजय चौटाला यांना सीबीआयच्या विशेष कोर्टाने प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसेच, या घोटाळ्याप्रकरणी एकूण 55 लोकांना कोर्टाने दोषी ठरविले आहे.
Dushyant Chatala, JJP leader on his father Ajay Chautala being granted furlough: He has been granted 14-day furlough after model code of conduct ended yesterday. Is parivartan ki neev ke andaar woh humare kandho ko taqat denge toh mera liye usse badi khushi ki baat kuch nahi hai. pic.twitter.com/V59bi1vMWw
— ANI (@ANI) October 26, 2019
जूनपासून चर्चेत होते अजय चौटाला
गेल्या जून महिन्यात तिहार जेलमध्ये झालेल्या तपासणी दरम्यान अजय चौटाला यांच्याजवळ असलेला मोबाइल जप्त करण्यात आला होता. तेव्हापासून अजय चौटाला चर्चेत आले होते.
मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री, तर दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री!
हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडीत जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्षअमित शहा यांची भेट घेतली आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले. राज्यात मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री तर, दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील असे अमित शहा यांनी नंतर पत्रकारपरिषदेत जाहीर केले.मनोहरलाल खट्टर यांची शनिवारी विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर राज्यपालांकडे नवे सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्यात येणार आहे. राज्यात स्थिरतेसाठी आपण ही युती केली असल्याचे दुष्यंत चौटाला यांनी सांगितले.