आजारी जयललितांची खाती तूर्त पनिरसेल्वम यांच्याकडे!

By Admin | Published: October 12, 2016 05:57 AM2016-10-12T05:57:39+5:302016-10-12T05:57:39+5:30

मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या दीर्घकाळच्या इस्पितळातील वास्तव्यामुळे तमिळनाडू राज्याच्या प्रशासनात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्याचा तात्पुरता उपाय म्हणून

Ajay Jayalalitha's accounts are now available to Panirselvam! | आजारी जयललितांची खाती तूर्त पनिरसेल्वम यांच्याकडे!

आजारी जयललितांची खाती तूर्त पनिरसेल्वम यांच्याकडे!

googlenewsNext

चेन्नई : मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या दीर्घकाळच्या इस्पितळातील वास्तव्यामुळे तमिळनाडू राज्याच्या प्रशासनात निर्माण झालेली अस्थिरता दूर करण्याचा तात्पुरता उपाय म्हणून जयललिता यांच्या सल्ल्यावरून त्यांच्याकडील सर्व खाती ओ. पनिरसेल्वम यांच्याकडे सोपविली. मुख्यमंत्रीपदी जयललिताच कायम असल्या तरी मंत्रिमंडळ बैठक मात्र पनिरसेल्वम यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे राजभवनाच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले.
तमिळनाडूत अशा प्रकारच्या घटनाक्रमाची ३६ वर्षांनी पुनरावृत्ती होत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व जयललिता यांचे राजकीय ‘गॉडफादर’ एम. जी. रामचंद्रन मृत्यूपूर्वी असेच दीर्घकाळ रुग्णशय्येवर होते; तेव्हाही राज्यपालांनी त्यांच्याकडील खाती तेव्हाचे वित्तमंत्री नेदुच्चेझिन यांच्याकडे सोपविली होती.
द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांनी पक्षकार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात अशा प्रकारची मागणी केल्यानंतर राज्यपालांनी हे पाऊल उचलले, हे विशेष. फायलींचे गठ्ठे साचले असून, केंद्रीय पथक विविध धरणांना भेटी देत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सक्रिय सरकार असणे काळाची गरज आहे, असे सांगून करुणानिधी यांनी तमिळनाडूत अंतरिम व्यवस्था निर्माण करण्याची मागणी केली होती. जयललिता आजारातून बऱ्या होऊन परतेपर्यंत लोकांच्या आवश्यक गरजांच्या पूर्ततेसाठी राज्याला ‘वाली’ हवा असे त्यांनी सुचविले.
मुख्यमंत्री येत्या काही दिवसांत परततील अशी अपेक्षा होती. तथापि, अपोलो रुग्णालयाच्या बुलेटिनमध्ये त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात थांबावे लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री इस्पितळात आणि मंत्री निर्णय घेण्यास असमर्थ यामुळे राज्याची अवस्था दिशाहीन झाली आहे, असे करुणानिधी यांनी
म्हटले. (वृत्तसंस्था)
खोटी माहिती पोस्ट केल्याने गुन्हा-
1मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर खोटी आणि दुर्भावनायुक्त माहिती पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी ४३ एफआयआर दाखल करून दोन जणांना अटक केली आहे. जयललिता यांच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्रमुक प्रमुखांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
2मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याविषयी सोशल मीडियावर दुर्भावनायुक्त आणि खोटी माहिती पोस्ट केल्याप्रकरणी एकूण ४३ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी विशेष पथके निर्माण करण्यात आली असून, सोशल मीडियावर खोटी व दुर्भावनायुक्त माहिती पोस्ट करणाऱ्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. अशा गुन्ह्यांसाठी सात वर्षांच्या सश्रम कारावासाची तरतूद आहे.
3सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांना जयललितांच्या आरोग्याबाबत खोटी आणि दुर्भावनायुक्त माहिती न पसरविण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असा मजकूर आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असा
इशारा पोलिसांनी दिला. चेन्नई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने नमक्कल आणि मदुराई जिल्ह्यांतून दोन जणांना अटक केली.
पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या सतीश कुमार याने फेसबुकवर दुर्भावनापूर्ण पोस्ट टाकल्याचे कबूल केले आहे.
4अद्रमुकच्या आयटी आघाडीचे सचिव जी. रामचंद्रन यांच्या तक्रारीवरून सतीशला अटक करण्यात आली. मदासामी हा स्वत: एक वेबसाईट चालवितो. त्याने मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत दुर्भावनायुक्त मजकूर पोस्ट केला होता. मदासामीविरुद्ध चेन्नईच्या एका रहिवाशाने तक्रार केली होती.
काश्मीरच्या मंत्र्यांकडून
प्रकृतीची विचारपूस
जम्मू आणि काश्मीरचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री चौधरी झुल्फिकार अली यांनी अपोलो रुग्णालयाला भेट देऊन जयललिता यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. त्या उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगण्यात आले. मी जम्मू-काश्मीर राज्य आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्या लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी कामना करतो, असे चौधरी यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एम. कृष्णासामी यांनीही रुग्णालयाला भेट दिली.
विशेष प्रार्थना
जयललितांची प्रकृती लवकर ठणठणीत व्हावी यासाठी अद्रमुकचे मंत्री, कार्यकर्त्यांनी आज विशेष प्रार्थना केली. मदुराई येथे दूधकलश मिरवणूक काढण्यात आली होती. सहकार मंत्री सेल्लूर के. राजू मिरवणुकीत सहभागी झाले होते.
जयललिता (६८) यांना ताप आणि निर्जलीकरणामुळे २२ सप्टेंबर रोजी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असून तज्ज्ञांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे,
असे रुग्णालयाने सोमवारी सांगितले होते. प्रकृतीबाबत खोटी माहिती पोस्ट करणारे दोघे अटकेत, ४३ एफआयआर दाखल.

Web Title: Ajay Jayalalitha's accounts are now available to Panirselvam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.