सलमानला सायकलिंगचे स्टंट शिकवणा-या अजय पडवळचा मृत्यू
By Admin | Published: July 13, 2017 11:51 AM2017-07-13T11:51:28+5:302017-07-13T12:08:59+5:30
सलमान खानला सायकलिंगचे स्टंट शिकवणारा पुण्याचा प्रसिद्ध सायकलस्वार अजय पडवळचा मंगळवारी रात्री सायकलिंग करताना दुर्देवी मृत्यू झाला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला सायकलिंगचे स्टंट शिकवणारा पुण्याचा प्रसिद्ध सायकलस्वार अजय पडवळचा बुधवारी रात्री सायकलिंग करताना दुर्देवी मृत्यू झाला. लेह-लडाखच्या खारदुंग ला भागात रात्री आठच्या सुमारास अजयच्या सायकलला अपघात झाला. सायकलिंग करताना तोल जाऊन अजय दगडावर आदळला. दुर्घटनेच्यावेळी अजयने डोक्यात हेल्मेट घातले होते. पण हेल्मेट असूनही अजयच्या डोक्याला जबर मार बसला.
अजयसोबत असलेल्या सहका-यांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. अजयला ज्या रुग्णालयात नेण्यात आले त्याठिकाणी आवश्यक उपचारांची सुविधा नव्हती. त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीला हलवणे आवश्यक होते. पण प्रशासनाने आवश्यक परवानगी देण्यात वेळ काढल्याने त्याला उपचार मिळू शकले नाहीत असा आरोप अजयच्या मित्रांनी केला. अजयला तातडीने दिल्लीला हलवलं असत तर त्याचे प्राण वाचले असते असे अजयच्या मित्रांनी सांगितले.
आणखी वाचा
अजय पडवळ हे देशातल्या सायकलिंग क्षेत्रातल खूप मोठ नाव होतं. देशातल्या टॉप टेन माऊंटन बाइकर्समध्ये अजयच्या नावाचा समावेश व्हायचा. सलमानच्या गाजलेल्या "किक" सिनेमातील सायकलिंगचे अनेक स्टंट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अजयनेच सलमानला सायकलिंगचे हे स्टंट शिकवले होते. या सिनेमातील सायकलिंगचे अनेक स्टंट स्वत: अजयने केले होते. अजय आणि सलमानच्या शरीरयष्टीत मोठी तफावत असल्याने हे सीन्स करताना अजयला बॉडी पॅकिंगचा आधार घ्यावा लागला होता.
अजय पडवळने 1 जुलैपासून मित्रांसोबत सायकलिंगचा प्रवास सुरु केला होता. ते लेहला जाणार होते. पण त्यांनी कारगिलला जायचे ठरवले. अजयची शेवटची फेसबुक पोस्ट 5 जुलैची आहे. त्यामध्ये त्याने आपण कारगिलला जात असून पुढचे काही दिवस संपर्कक्षेत्राच्या बाहेर असू असे म्हटले आहे. अजय सोबत गेलेली त्याची मैत्रिण आभा पंडितने सांगितले की, मंगळवारी सकाळी अजयने तो सायकने खारदुंग ला येथे जात असल्याचे सांगितले. दुपारी तीन-चारपर्यंत परत येऊ असे त्याने सांगितले होते. अजय वेळेत परतला नाही तेव्हा आम्ही त्याने ज्या दुकानातून भाडयावर सायकल घेतली होती तिथे गेलो त्यावेळी आम्हाला त्याचा अपघात झाल्याचे समजले.