अजित डोवाल-सीआयए प्रमुखांत झाली गुप्त चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:50 AM2021-09-09T05:50:05+5:302021-09-09T05:51:00+5:30
रशियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांसोबतही बैठक
नवी दिल्ली : अमेरिकन गुप्तचर संस्थेचे (सीआयए) प्रमुख विल्यम बर्न्स आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांच्यांत मंगळवारी तालिबानशासित अफगाणिस्तानच्या स्थितीवर गुप्ता चर्चा केल्याचे समजते. बर्न्स यांनी डोवाल यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सचिवालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्याचे वृत्त आहे. तथापि,बर्न्स यांच्या भारत भेटीबाबत गोपीनयता राखण्यात आली. अमेरिकन दूतावास बर्न्स यांच्या दौऱ्याबाबत टिप्पणी करण्यास नकार दिला. भारतीय सुरक्षा अस्थापनानेही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीआयए प्रमुख बर्न्स हे काही अधिकाऱ्यांसमवेत भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेतल्यानंतरच्या अफगाणमधील स्थितीवर चर्चा केल्याचे समजते.
बर्न्स, रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव जन. निकोलाय पॅत्रूशेव्ह तसेच ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे (एमआय-६) प्रमुख रिचर्ड मूर यांच्यासह अनेक मुख्य गुप्तचर आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत भारताचा दौरा केल्याचे समजते. बुधवारी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी रशियाच्या सुरक्षा परिषदेचे जन. निकोलाय पॅत्रूशेव्ह यांच्याशी अफगाणिस्तानमधील स्थितीवर चर्चा केली. तालिबानशासित अफगाणमधून सुरक्षेबाबत संभाव्य धोक्यांबाबत दोघांत चर्चा झाली. शिष्टमंडळस्तरीय चर्चेनंतर रशिया निवेदनात म्हटले की, दोन्ही देशांनी विशेष सेवा आणि लष्करी संस्थादरम्यानचे संयुक्त कार्य गतीमान करण्याबाबत विचार केला. तसेच अमलीपदार्थांची तस्कारी आणि दहशतवादविरोधी उपाय-योजनांवर बोलणी करण्यावर भर देण्यात आला.