अजमेर स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप
By admin | Published: March 22, 2017 12:54 PM2017-03-22T12:54:02+5:302017-03-22T12:54:16+5:30
अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 22 - अजमेर दर्गा बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जयपूरच्या विशेष एनआयए न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. न्यायालयाने दोषी ठरवलेल्या देवेंद्र गुप्ता आणि भावेश पटेल यांना ही जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गेल्या सुनावणीत न्यायालयाने तिघांना दोषी ठरवलं होतं. सुनील जोशी ज्यांचं आधीच निधन झालं आहे त्यांच्यासोबत भावेश आणि देवेंद्र गुप्ता यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. न्यायालयाने आज दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
8 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत न्यायलायने स्वामी असीमानंद यांच्यासोबत अन्य पाच जणांची निर्दोष मुक्तता केली होती. याच सुनावणीत भावेश पटेल आणि देवेंद्र गुप्ता यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. विशेष म्हणजे 2011 रोजी असीमानंद यांना बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणणा-या एनआयएने कोणताही पुरावा सापडला नसल्याचं सांगितलं होतं.
काय आहे अजमेर बॉम्बस्फोट प्रकरण
11 ऑक्टोबर 2007 रोजी अजमेर येथील प्रसिद्ध सुफी संत मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 15 जण जखमी झाली आहे. दर्ग्यामध्ये बॉम्बस्फोट घडवण्यासाठी दोन रिमोट बॉम्ब ठेवण्यात आले होते. मात्र त्यापैकी केवळ एकाच बॉम्बचा स्फोट झाला.
या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास राजस्थान एटीएसने केला होता. या तपासादरम्यान एटीएसने 2010 साली तीन आरोपी देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा आणि चंद्रशेखर लेवे यांना अटक केली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2010 साली या प्रकरणी पहिले आरोपपत्र दाखल झाले. मात्र एप्रिल 2011 मध्ये गृहमंत्रालयाने या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास एटीएसकडून काढून घेत एनआयएकडे सोपवला.
एनआयएने तपासाला सुरुवात केल्यानंतर स्वामी असीमानंद, हर्षद सोळंकी, मुकेश बसानी, भरतमोहनलाल रतेश्वर, भावेश अरविंदभाई पटेल, आणि मफत ऊर्फ मेहूल यांना अटक केली होती. या प्रकरणी एनआयएचे विशेष न्यायालय शनिवारी आपला निर्णय सुनावणार होते, पण प्रकरणाचे गांभीर्य पाहता साक्षीपुराव्यांच्या अभ्यासासाठी अजून काही वेळ लागेल, असे सांगत विशेष न्यायालयाने निकाल पुढे ढकलला होता.