Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 02:53 PM2024-11-28T14:53:42+5:302024-11-28T14:56:22+5:30

राजस्थानातील अजमेरमध्ये असलेल्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होतं, असा दावा करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ajmer sharif dargah shiv mandir asaduddin Owaisi d y chandrachud places of worship act 1991 | Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 

Ajmer Dargah Shiv Mandir: अजमेर दर्गा असलेल्या ठिकाणी पूर्वी शिव मंदिर होतं, अशी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही याचिका न्यायालयाने दाखल करून घेतली असून, यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्रालय, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाही नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नवा मुद्दा राजकीय पटलावर आला असून, यावरून एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी सेवानिवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. 

राजस्थानमधील अजमेर येथे असलेला प्रसिद्ध ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी पूर्वी शिवमंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने दर्गा प्रशासन आणि इतरांना नोटीस पाठवण्याचे आदेश दिले. या प्रकरणी २० डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. 

असदुद्दीन ओवेसी काय बोलले?

अजमेर शरीफ दर्गा प्रकरणावर बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "८०० वर्षांपासून तिथे दर्गा शरीफ आहेत. ८०० वर्षात अल्लाउद्दीन खिलजीपासून, अमीर खुसरोचे पुस्तक आहे, त्यात या दर्ग्याबद्दल लिहिलेलं आहे. बादशाह अकबराने तिथे अनेक गोष्टी केल्या. मुघलाचं शासन जेव्हा संपलं. मराठ्यांची राज्य आलं. त्यानंतर त्यांचं शासन कमी होत गेलं, तेव्हा त्यांनी १८००० रुपयांमध्ये तो ब्रिटिशांना दिला."

"त्यावेळी जयपूरच्या राजघराण्याने या दर्ग्यासाठी ४० किलो चांदी दिली होती. त्यांनी दर्ग्याची सेवा केली. देशाचे पंतप्रधान तिथे चादर चढवतात. आपल्या शेजारील राष्ट्राचे शिष्टमंडळ तिथे जातात. जगभरातील लोक तिथे येतात. आज अचानक तुम्ही ही कृती करत आहात. सलीम चिश्तीची दर्गा नाहीये. ख्वाजा गरीब नवाजांची दर्गा नाहीये. हे कुठे थांबवणार आहे?", असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. 

धनंजय चंद्रचूड यांच्या निकालाबद्दल ओवेसी काय बोलले?

"प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्ट १९९१ चं (places of worship act 1991) काय होणार? डी.वाय. चंद्रचूड आता सरन्यायाधीश नाहीयेत. आता त्यांच्या मनात विचार येतोय का की, त्यांनी हे थांबवलं असतं. राम मंदिराच्या निकालात त्यांनी places of worship act 1991 हा मूळ गाभ्याचा हिस्सा आहे. त्यानंतर सरन्यायाधीश शांत झाले. आता चंद्रचूड त्यांचा वारसा जपण्यासाठी प्रत्येक ठिकाणी माध्यमांना मुलाखती देत बसले आहेत. बघा त्यांनी हे काय करून ठेवलं आहे", असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.

मोदींनी चादर चढवली, ते सांगणार का की तो दर्गा आहे की नाही?

"तुम्ही बघितलं संबलमध्ये काय झालं. पाच लोकांचा मृत्यू झाला. आता भारत सरकारच्या अल्पसंख्याक विभागाला पक्ष बनवण्यात आले आहे. आता नरेंद्र मोदींचं सरकार, मोदी त्यावर चादर चढवली, ते सांगणार आहेत की, तो दर्गा आहे की नाही? भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग काय सांगणार? हे सगळं देशाला अस्थिर करण्यासाठी आहे. हे देशाच्या हिताचं नाहीये. हे जे लोक आहेत, यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे. हे कोणीही नाकारू शकत नाही", असे ओवेसी म्हणाले.    
 

Web Title: ajmer sharif dargah shiv mandir asaduddin Owaisi d y chandrachud places of worship act 1991

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.