अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 03:47 PM2024-11-29T15:47:24+5:302024-11-29T16:10:53+5:30
Mehbooba Mufti : अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही याचिका मान्य केली.
Mehbooba Mufti : सुप्रसिद्ध अजमेर दर्ग्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही याचिका मान्य केली. याबाबत काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या प्रकरणासाठी माजी सरन्यायाधीशांना जबाबदार धरले आहे.
मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, "या घटनेला माजी सरन्यायाधीश जबाबदार आहेत. त्यांनी चुकीचे काम केले आहे. त्यांनी ज्ञानवापी मशिदीबाबत निर्णय दिला की, तुम्ही सर्वेक्षण करू शकता. १९४७ मध्ये धार्मिक स्थळांची जशी स्थिती होती तशीच ठेवावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता. पण, माजी सरन्यायाधीशांनी निर्णय दिला की, ज्यामध्ये आधी मशिदींमध्ये शिवलिंगांची झडती घेतली जायची, आता मशिदींमध्ये सर्वेक्षण केले जात आहे."
आता अजमेर शरीफमध्येही शिवलिंगांचा शोध घेतला जात आहे. जिथे मोठ्या संख्येने हिंदू लोक जातात आणि ती ८०० वर्षे जुनी मशीद आहे, असे मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या. तसेच, आता मुस्लिमांच्या घरात मंदिरं शोधली जातील, असं वाटतंय. हे लोक देशाला विनाशाकडे घेऊन जात आहेत. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींनी घालून दिलेल्या भारताच्या अस्मितेचा पाया डळमळीत होत आहे, असेही मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले.