अकाली नेत्यावर बलात्काराचा गुन्हा, मुलीच्या मैत्रिणीवर अत्याचार, पोलिसांकडे पुराव्यांसह तक्रार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 02:23 AM2017-10-01T02:23:06+5:302017-10-01T02:23:27+5:30
पंजाबात ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या गुरदासपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुचासिंग लांगा यांच्यावर एका पोलीस हवालदार महिलेचे सुमारे एक दशकभर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चंदीगढ : पंजाबात ११ आॅक्टोबर रोजी होत असलेल्या गुरदासपूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत असतानाच शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते सुचासिंग लांगा यांच्यावर एका पोलीस हवालदार महिलेचे सुमारे एक दशकभर लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
लांगा हे २००७ ते २०१२ या काळात अकाली दल सरकारमध्ये कृषिमंत्री होते. या महिलेची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर
आहे. संबंधित तक्रारदार महिलेने आपल्यावरील लैंगिक अत्याचाराचा एक व्हिडिओ शूट केला असून,
त्याची क्लिप पोलिसांना देण्यात आली आहे. गुरदासपूरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरचरणसिंग बुल्लर यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षकांकडे सोपविण्यात आला आहे.
एफआयआरमध्ये ३९ वर्षीय तक्रारदार महिलेने म्हटले आहे की, लांगा यांची मुलगी सरबजित
कौर आणि मी गुरदासपूर येथील बेबे नानकी कॉलेजात एकाच वर्गात शिकत होतो. २००९ मध्ये या
छळाला सुरुवात झाली. पोलीस हवालदार असलेला आपला पती वारल्यामुळे अनुकंपा धर्तीवर नोकरी मिळावी यासाठी आपण आपल्या नातेवाईकांसह लांगा यांना भेटलो होतो.
त्यांनी दोन दिवसांनी एकटीला भेटायला बोलावून आपल्यावर लैंगिक अत्याचार केला. मी खूप
विनवण्या केल्या. तुमच्या मुलीच्या वर्गात असल्यामुळे मी तुमच्या मुलीसारखीच आहे, असे सांगितले. पण त्यांनी काहीही ऐकले नाही. आपण म्हणू तसे न केल्यास
उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या ओळखीच्या गुंडांकरवी
ठार मारण्याची धमकी त्यांनी
दिली, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
लांगा यांनी सोहल गावातील आपल्या मालकीचा भूखंड विकून ३० लाख हडप केले. आपल्याला केवळ ४.५ लाख रुपये दिले. त्याबद्दल तक्रार करताच, त्यांनी नंतर एका स्थानिक खासगी बँकेकडून आपणास ८ लाखांचे कर्ज मिळवून दिले. पण त्या आठ लाखांतील प्रत्यक्षात १ लाखच मला दिले, असा आरोपही या महिलेने केला आहे. (वृत्तसंस्था)
हे तर षडयंत्र-माजी मंत्र्याचा दावा
लांगा हे ६१ वर्षांचे असून, ते शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे दोन दशकांपासून ज्येष्ठ सदस्य आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये ते निवडणूक हरले असले तरी माझा भागातील अकाली दलाचे ते प्रमुख नेते आहेत.
त्यांनी आपल्यावरील आरोप खोटे आहेत, असल्याचा दावा केला आहे. ही राजकीय सूडाची कारवाई आहे. आपल्या पक्षाला निवडणुकीत फटका बसावा यासाठी रचण्यात आलेले हे षड्यंत्र आहे.
पक्ष अडचणीत येऊ नये म्हणून आपण पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊ, तसेच न्यायालयात समर्पण करू, असेही ते म्हणाले.