पाकिस्तानला कुणी एक शिवी दिली, तर मी त्याला दहा शिव्या देईन; काश्मिरी नेता बरळला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:32 PM2019-03-25T12:32:24+5:302019-03-25T12:33:22+5:30
पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी अशा विधानाने अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानेही सुरु झाली आहेत. जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन यांनी पाकिस्तानबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा येथे सभेत बोलताना अकबर लोन यांचे पाकिस्तानवरील प्रेम उफाळून आले आहे. जर पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी येथून दहा शिव्या देईन. एवढेच म्हणून ते थांबले नाहीत. तर त्यांनी, पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची दोस्ती वाढावी. त्या दोस्तीचा मी आशिक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी अशा विधानाने अकबर लोन यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय.
NC's Akbar Lone in Kupwara on Mar 23: Mera paar wala wo musalmaan mulk(Pak)hai,wo abaad rahay, vo kamyaab rahe, hamari aur unki dosti badhe,Pak aur Hindustan ki dosti aapas mein rahe,uss dosti ka mai aashiq hun...Agar unko koi aik gali dega mai unko yahan se dass galiyan de dunga pic.twitter.com/xVc6uHMJNN
— ANI (@ANI) March 25, 2019
23 मार्च रोजी कुपवाडा येथील जाहीर सभेत बोलताना अकबर लोन पुढे म्हणाले की, माझ्या पलीकडे असणारा देश मुसलमानांचा देश आहे. पाकिस्तानसोबत आपली मैत्री कायम राहायला हवी. पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर मग मी त्याला 10 शिव्या देईन असं अकबर लोन म्हणाले.
अकबर लोन यांनी केलेल्या या वक्तव्यावर सोशल मिडीयावर नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला. अकबर लोन हे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. लोकसभा निवडणुकीत पाकिस्तान मुद्दा प्रचारासाठी वापरला जात आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांच्या मनात पाकिस्तानबद्दल चीड निर्माण झाली आहे.
अकबर लोन यांनी पाकिस्तानबद्दलचे प्रेम पहिल्यांदा व्यक्त केलंय अस नाही तर याआधीही लोन यांनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजपाचे काही आमदार सभागृहात पाकिस्तान विरोधी घोषणा देत होते, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या त्यावेळीही असा वाद उफाळून आला होता.
यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पार्टीची आघाडी झाली आहे. काँग्रेस जम्मू आणि उधमपूर या जागेवरुन निवडणूक लढवणार आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुला श्रीनगरवरुन निवडणूक लढवणार आहेत. अनंतनाग, बारामुला आणि लडाख याठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. जम्मू काश्मीरच्या 6 जागांपैकी 5 जागेवर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.