आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बेपत्ता, भोंदू बाबांची यादी जाहीर केल्यानंतर बेपत्ता झाल्याने तर्कवितर्क
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 11:41 AM2017-09-18T11:41:07+5:302017-09-18T11:45:04+5:30
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हरिद्वारहून मुंबईच्या दिशेने जात असताना रेल्वे प्रवासात महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत.
लखनऊ, दि. 18 - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत मोहनदास बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हरिद्वारहून मुंबईच्या दिशेने जात असताना रेल्वे प्रवासात महंत मोहनदास बेपत्ता झाले आहेत. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास महंत मोहनदास यांचा एक शिष्य भोपाल रेल्वे स्थानकावर जेवण घेऊन आला होता, त्यावेळी महंत मोहनदास बेपत्ता झाल्याचं त्याच्या लक्षात आलं. यानंतर त्याने महंत गायब झाल्याची माहिती आखाड्याला दिली. पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून, तपास सुरु आहे.
विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वी, आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. यावेळी नकली बाबांच्या यादीत जर आमच्या बाबांचे नाव आले तर तुम्हाला ठार मारू, अशा धमकीचा फोन आपल्याला आल्याचं अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी सांगितलं होतं. त्यामुळे महंत मोहनदास बेपत्ता झाल्याचं प्रकरण गांभीर्याने घेण्यात आलं असून, अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दरम्यान महंत नरेंद्रगिरी यांनी, 'भोंदू बाबांची यादी जारी केल्यानंतर आम्हाला धमक्या येत होत्या. आता साधू-संतही सुरक्षित नाहीत, त्यामुळे सुरक्षेत वाढ करावी', अशी मागणी केली आहे.
स्वयंभू बाबांमुळे अलीकडच्या काळात समोर आलेल्या काही प्रकरणांनंतर हिंदू साधूंची सर्वोच्च संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने १४ भोंदू बाबांची नावे जाहीर केली होती. या यादीत बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले राम रहीम, आसाराम बापू यांच्यासह राधे माँचाही समावेश आहे. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १३ आखाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. भोंदू बाबांची यादी जाहीर करताना महंत नरेंद्रगिरी म्हणाले होते की, आम्ही सामान्य नागरिकांना आवाहन करत आहोत की, अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावे. अशा व्यक्ती कोणत्याही संपद्रायाच्या नाहीत. आपल्या कृत्यांमुळे साधू-संतांना कलंकित करण्याचे काम ते करत आहेत.
नरेंद्रगिरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते की, आम्ही ही यादी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विरोधी पक्षांना सोपवून या भोंदू बाबांवर कारवाईची मागणी करणार आहोत.
हे आहेत ढोंगी बाबा -
- आसाराम बापू उर्फ आशुमल शिरमलानी
- सुखबिंदर कौर उर्फ राधे मां
- सच्चिदानंद गिरी उर्फ सचिन दत्ता
- गुरमीत राम रहीम सिंह
- ओमबाबा उर्फ विवेकानंद झा
- निर्मल बाबा उर्फ निर्मलजीत सिंह
- रामपाल
- आचार्य कुशमुनि
- वृहस्पति गिरी
- मलखान सिंह
- इच्छाधारी भीमानंद उर्फ शिवमूर्ति द्विवेदी
- स्वामी असीमानंद
- ओम नमः शिवाय बाबा
- नारायण साईं
संत उपाधी देण्याबाबतही निर्णय
यावेळी अखिल भारतीय अखाड़ा परिषदेने 'संत' उपाधी देण्यासाठी प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित व्यक्तीची संपूर्ण पडताळणी करुन त्याचं आकलन करून नंतरच संत ही उपाधी बहाल केली जाणार आहे. याद्वारे गुरमीत राम रहीम सारख्या लोकांकडून होत असलेल्यी धर्माच्या नावाखालील फसवणुकीला आळा बसेल. विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) संयुक्त महासचिव सुरेंद्र जैन म्हणाले, एक-दोन भोंदू व्यक्तींमुळे सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्यामुळे संत उपाधी देणयाआधी संपूर्ण पडताळणी केली जाणार आहे.
‘संत’पदाची पद्धत ठरविणार
‘संत’पद बहाल करण्याची निश्चित पद्धत ठरविण्यात येणार असल्याचे आखाडा परिषदेने ठरविले आहे. एखाद्या व्यक्तीची पूर्ण पडताळणी करूनच हे पद बहाल करण्यात येणार आहे. या व्यक्तीची जीवनशैली आणि संपूर्ण माहिती एकत्रित केली जाणार आहे. एका संताजवळ कोणतीही नगदी किंवा अन्य संपत्ती असायला नको. ही संपत्ती ट्रस्टची असायला हवी. त्याचा उपयोग जनकल्याणासाठी व्हायला हवा.