Akhand Bharat : नवीन संसदेत अखंड भारताचा नकाशा; पाकिस्तानसह नेपाळने केली टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 01:35 PM2023-06-02T13:35:20+5:302023-06-02T13:36:03+5:30
Akhand Bharat Mural : भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत 'अखंड भारत'चा नकाशा बसवण्यात आला आहे.
Akhand Bharat Mural Pakistan Nepal:भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत 'अखंड भारत'चा नकाशा (म्युरल आर्ट) पाहून शेजारी देश संतप्त झाले आहेत. आधी नेपाळ आणि आता पाकिस्तानने 'अखंड भारत'बाबत आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच म्हणाल्या की, भारतीय संसदेच्या नवीन इमारतीत दाखवण्यात आलेला तथाकथित 'अखंड भारत'मध्ये पाकिस्तान आणि इतर शेजारी देशांचा भूभागही दाखवण्यात आला आहे. हे वाईट हेतूने करण्यात आले असून, यामुळे भारताची विस्तारवादी मानसिकता उघड होते.
भारतीय संसदेत दाखवल्या जाणाऱ्या अखंड भारताच्या भित्तिचित्रामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, 'अखंड भारत'चा दावा हा भारतातील लोकांच्या विस्तारवादी मानसिकतेचे प्रदर्शन आहे. हा केवळ आपल्या शेजारी देशांनाच नव्हे तर धार्मिक अल्पसंख्याकांची विचारधारा आणि संस्कृती देखील दडपून टाकणारा आहे. आम्ही आवाहन करतो की, भारताने विस्तारवादी विचारसरणीपासून दूर राहावे आणि आपल्या शेजारी देशांसोबतचे वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी पुढे यावे.
'अखंड भारत'च्या म्युरल आर्टवर शेजारी संतापले
भारतीय संसदेच्या नवीन इमारतीमध्ये 'अखंड भारत'च्या भित्तीचित्रात प्राचीन भारताचा नकाशा दाखवण्यात आला आहे, ज्यावर भारतीय राज्यांची नावे लिहिली आहेत. या म्युरल आर्टमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तान, पाकिस्तान, मालदीव, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश आणि भारत एकत्र दाखवण्यात आला आहे. उत्तरेकडील मनशरी तक्षशिला, वायव्येकडील पुरुषपूर आणि ईशान्येकडील कामरूपपर्यंतचे क्षेत्र यात आहे. भारताचा प्राचीन इतिहास पाहिला तर हा नकाशा चुकीचा नाही. कारण, पूर्वी पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, म्यानमार आणि अफगाणिस्तान नावाचे देश नव्हते. त्यांची स्थापना गेल्या 1000 वर्षांत झाली. तसेच, पाकिस्तान-बांगलादेशच्या निर्मितीला 100 वर्षेही झाली नाहीत.
नेपाळचे माजी पंतप्रधान ओलीही भडकले
नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनीदेखील यावर नाराजी व्यक्त केली आहे. यामागे भारताचा काय हेतू आहे, हे स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. तसेच, नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली हेदेखील या भित्तिचित्रामुळे संतापले आहेत. ओली म्हणाले- भारतासारखा देश जो स्वतःला एक प्राचीन आणि प्रस्थापित देश आणि लोकशाहीचे मॉडेल मानतो, नेपाळी भाग आपल्या नकाशात ठेवतो आणि संसदेत नकाशा लावतो, हे योग्य नाही. आमचे पंतप्रधान प्रचंड यांनी त्यांच्या भारत भेटीदरम्यान भारताकडून याबाबत स्पष्टीकरण मागवले पाहिजे.