ज्ञानोबा आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते - पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 18:58 IST2025-02-21T18:57:10+5:302025-02-21T18:58:27+5:30
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan Delhi 2025 : महाठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरताही आहे आणि वीरताही आहे. मराठीमध्ये सौंदर्यही आहे आणि संवेदनाही आहे. समानताही आहे आणि समरसताही आहे. यात आध्यात्माचे स्वरही आहे आणि आधुकताही आहे. मराठीत भक्तीही आहे, शक्तीही आहे आणि युक्तीही आहे. अशा शब्दात मोदींनी मराठी भाषेची महती सांगितली...

ज्ञानोबा आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली मनापासून अभिवादन करते - पंतप्रधान मोदी
मराठी साहित्याच्या या संमेलनात स्वातंत्र्याच्या लढाईचा सुगंध आहे. हिला महाराष्ट्र आणि देशाचा सांस्कृतीक वारसा आहे. ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्लीत अतिशय मनापासून अभिवादन करते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजपासून दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या 147 वर्षांच्या प्रवासाचे साक्षिदार -
मोदी म्हणाले, "बंधूंनो १८७८ मधील पहिल्या आयोजनापासून ते आतापर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाच्या 147 वर्षांच्या प्रवासाचे साक्षिदार राहिले आहे. महादेव गोविंद राणडे, हरिनारायण आपटे, शिवराम परांजपे, वीर सावरकर, देशातील अनेक महान विभूतींनी, याचे अध्यक्षस्थान स्वीकारले आहे. आज मला या परंपरेशी जोडले जाण्याची संधी मिळाली. मी देश आणि जगातील सर्वच मराठी प्रेमींना या आयोजनाच्या शुभेच्छा देतो आणि आज तर जागतिक मातृभाषा दिवसही आहे. तुम्ही या संमेलनासाठी दिवसही अत्यंत चांगला निवडला आहे."
भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर संस्कृतीची वाहक -
मोदी पुढे म्हणाले, "भाषा केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या संस्कृतीची वाहक असते. भाषा समाजात जन्म घेते मात्र, भाषा समाजाच्या निर्मितीत तेवढीच महत्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या मराठीने महाराष्ट्र आणि राष्ट्रातील अनेकांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन आपली सांस्कृतीक जडणघडण केली आहे. यामुळे, समर्थ रामदास म्हणत होते,
'मराठा तितुका मेळवावा।
महाराष्ट्र धर्म वाढवावा।
आहे तितुके जतन करावे।
पुढे आनिक मिळवावे।
महाराष्ट्र राज्य करावे।।"
मराठी एक संपूर्ण भाषा -
"मराठी एक संपूर्ण भाषा आहे. मराठीत शूरताही आहे आणि वीरताही आहे. मराठीमध्ये सौंदर्यही आहे आणि संवेदनाही आहे. समानताही आहे आणि समरसताही आहे. यात आध्यात्माचे स्वरही आहे आणि आधुकताही आहे. मराठीत भक्तीही आहे, शक्तीही आहे आणि युक्तीही आहे." अशा शब्दात मोदींनी मराठी भाषेची महती सांगितली.