जुगलबंदीमध्ये अखिलेशची मोदींवर मात; प्रतिसाद वाढला
By admin | Published: February 23, 2017 01:42 AM2017-02-23T01:42:43+5:302017-02-23T01:42:43+5:30
पोस्टर वॉरमधे ज्यांना ‘यूपी के लडके ’ संबोधले जाते, त्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीने
सुरेश भटेवरा / अलाहाबाद
पोस्टर वॉरमधे ज्यांना ‘यूपी के लडके ’ संबोधले जाते, त्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या जोडीने यंदा निवडणुकीत केवळ पंतप्रधान मोदींची दमछाक केली नाही, तर भाजपच्या तुलनेत ही जोडी हिट ठरली. जाहीर सभांमधे पंतप्रधान मोदींना अखिलेश व राहुल खुलेपणाने ललकारताना, नर्मविनोदी शैलीत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. भाजपाचा व्यवहार व नोटाबंदीवर संतापलेले मतदार या जोडीच्या सभांना, रोड शोला प्रतिसाद देत आहेत.
अखिलेश यादव मुख्यमंत्रिपदाचे घोषित उमेदवार आहेत. भाजपाने आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मायावती स्वत:च बसपाच्या उमेदवार आहेत. या त्रिकोणी लढतीत मोदी व अखिलेश यांच्यातील जुगलबंदीने उत्तर प्रदेश निवडणुकीचा अजेंडाच एका प्रकारे सेट होत आहे. उभयतांच्या सवाल जबाबांनी राज्याच्या प्रत्येक भागात लक्षवेधी रंग भरले जात आहेत.
अखिलेश यादवांनी मोदींच्या भाषणावर कोणत्या वेळी कोणत्या मुद्द्यावर कशा प्रकारे हल्ला चढवावा, याची पटकथा काँग्रेसचे रणनीतीकार प्रशांत किशोर यांची टीम लिहिते आहे.‘मोदींवर आगखाऊ शब्दात हल्ले चढवू नका, अन्यथा मोदी टीमला प्रत्युत्तराच्या भाषणात आपल्यावर कुरघोडी करण्याची संधी मिळेल. निवडणुकीचा अजेंडा आपल्या हातून निसटून भाजपच्या हाती जाईल, असा सूचक सल्ला प्रशांत किशोरनी अखिलेश यादवांना दिला. त्याचे पूर्णत: पालन करीत, नर्मविनोदी शैलीत मोदींना ते प्रत्युत्तरे देत त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
दत्तकपुत्रापासून गंगेच्या शपथांपर्यंत हा प्रवास पोहोचला. आकडेवारीचे प्रत्युत्तर आकडेवारीने दिले गेले. उत्तरप्रदेशच्या समरांगणात प्रचारमोहिमेला प्रारंभ झाल्यापासून प्रशांत किशोरांच्या रणनीतीनुसार केंद्रस्थानी मोदी नव्हे तर अखिलेश यादवच राहिले आहेत. सहा महिन्यांपूर्वी हेच अखिलेश यादव मुलायमसिंगांच्या आदेशांपुढे मान तुकवणारे दुय्यम दर्जाचे नेते होते. पित्याचा आदेश डावलण्याची हिंमतही त्यांच्यापाशी नव्हती. निवडणुकीनंतर भाजप आणि बहुजन समाज पक्ष जर सत्तेसाठी एकत्र आले नाहीत तर कोणत्याही स्पर्धेविनाच अखिलेश यादव मुख्यमंत्रिपदावर सहज विराजमान होतील, अशीच एकूण स्थिती आहे.
मोदी अखिलेशवर तुफान हल्ले चढवीत सुटले आहेत आणि अखिलेश त्याची शांतपणे उत्तरे देत आहेत. मोदी आणि अमित शाह यांच्या आक्रमक स्वरांनी भाजपच्या प्रचारसभांना बाजारी स्वरूप आले आहे. कब्रस्तान, स्मशान, होळी, दिवाळी, बहनजी संपत्ती पार्टी, अशा इंग्रजी अक्षरांच्या कोट्या करण्याचा खेळ मोदींनी सुरू केला.
निवडणुकीपूर्वी गृहकलहावर यशस्वी मात करीत पाच वर्षांच्या कारकीर्दीच्या अँटी इन्कम्बन्सीचे ओझेही अखिलेशनी पक्षाच्या खांद्यावर पडू दिले नाही. समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात तर
स्वबळावर सत्ता मिळण्याची स्वप्ने रंगवली जात आहेत. प्रत्यक्ष रणांगणात मात्र १५0 च्या आसपास जागा मिळतील आणि समाजवादी हा राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरेल असा कयास आहे.