अखिलेश इतका कुणीही माझा अपमान केला नाही - मुलायम सिंह
By Admin | Published: April 1, 2017 04:38 PM2017-04-01T16:38:13+5:302017-04-01T17:32:09+5:30
जो स्वतःच्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुस-या कुणाचाही होऊ शकत नाही, अशी बोचरी टीका मुलाय सिंह यादवांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 1 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
जो आपल्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुसऱ्या कुणाचाही होऊ शकत नाही, अशा शब्दात मुलायम यांनी अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मेनपुरी येथील पार्टीतील कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुलायम सिंह यादव यांनी हे विधान केलं आहे.
शिवाय,यापूर्वी माझा एवढा अपमान कधीही झाला नव्हता. मी अखिलेशला मुख्यमंत्री बनवलं मात्र त्यानं माझं काहीही एक ऐकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मुलायम सिंह यांनी भारतीय राजकारणाचं उदाहरण देत सांगितले की, कोणत्याही बापाने स्वतः राजकारणात असताना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवल्याचे मी पाहिले नाही. अखिलेशनं काका शिवपाल सिंह यांनाही मंत्री पदावरुन हटवलं, असं सांगत त्यांनी भाऊ शिवपाल सिंह यादव यांचा झालेल्या अपमानाबाबतही यावेळी भाष्य केलं.
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यांनी पार्टीत तख्ता पालट करत एक विशेष राष्ट्रीय अधिवेशन बोलावलं होतं. यावेळी त्यांनी स्वतःला पक्षाचे अध्यक्ष व वडील मुलायम सिंह यादव यांना पक्षाचे संरक्षक म्हणून घोषित केलं होतं. तर काका शिवपाल सिंह यादव यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर हटवलं होतं. याशिवाय अमर सिंह यांनाही बाहेर रस्ता दाखवला होता. या बदलानंतर जवळपास दोन महिन्यांपर्यंत पक्ष आणि यादव कुटुंबात दंगल सुरू होती.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांच्याकडून मुलायम सिंह यांना बाजूला सारण्यात आल्यानं पक्षाला निवडणुकीत हार पत्करावी लागली, असे अनेक सपा नेत्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे अखिलेश यांनी पक्ष प्रमुखाचा पदभार स्वीकारताना, "मला माझ्या वडिलांचा खूप आदर आहे", असे म्हटलं होते. मात्र निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवडे झाले तरी आतापर्यंत दोघांमध्ये साधा संवादही घडला नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यातील निवडणुकीतील पराभवाला अखिलेश जबाबदार नाही, असं मुलायम सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. शिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी मुलायम सिंह यादव अखिलेश यांचा हात धरुन व्यासपीठावर पोहोचले होते.
विशेष म्हणजे, "अखिलेशची काळजी घ्या", असे मुलायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात पुटपुटले होते, अशीही माहिती समोर आली आहे.